हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीने( Maha Vikas Aghadi) चांगलीच कंबर कसली आहे. कोणत्याही परिस्थितीत महायुती सरकार घालवायचंच असा चंग महाविकास आघाडीने बांधला आहे. त्यानुसार मागील काही दिवसांपासून जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांचे बैठकांचे सत्र सुरु होते. अखेर महाविकास आघाडीचे जागावाटप जवळपास निश्चित झालं आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि ठाकरे गट प्रत्येकी १०० जागा लढवेल, तर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ८४ आणि मित्रपक्षांना ४ जागा सोडण्यात येतील. एका वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.
महाविकास आघाडीचे जवळपास 80 टक्के जागा वाटपावर चर्चा पूर्ण झाली आहे. विदर्भ सोडून महाराष्ट्रातील उर्वरित मतदारसंघातील जागावाटपावर चर्चा करण्यात आली आहे. यातील 120 ते 130 जागांवर महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये सहमती झाल्याची सूत्रांची माहिती आहे. तिढा असलेल्या जागांवर दुसऱ्या टप्प्यात चर्चा केली जाणार असल्याची माहिती आहे. विदर्भातील विधानसभा जागांवर पुढील बैठकीत चर्चा होऊन त्या संदर्भात सुद्धा लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. तसेच २०१९ मध्ये ज्या मतदारसंघात जो उमेदवार जिंकला आहे ती जागा तशीच कायम ठेवण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात २८८ मतदारसंघ आहेत. सध्या पक्षीय बलाबल पाहता काँग्रेसकडे (Congress) सर्वाधिक आमदार आहेत, तर दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (Shivsen And NCP) हे दोन्ही पक्ष फुटल्याने महाविकास आघाडीत आम्हीच मोठा भाऊ असं काँग्रेस नेत्यांकडून सातत्याने सांगण्यात येत होते. उद्धव ठाकरेंची शिवसेना सुद्धा लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेसाठीही जास्त जागांची मागणी करत होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षही लोकसभेत कमी जागा घेतल्याने विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागांसाठी आग्रही होता. त्यामुळे महाविकास आघडीत जागावाटपावरून तिढा पडण्याची शक्यता होती. मात्र महाविकास आघाडीचे जागावाटप जवळपास ठरल्याचे चित्र आता स्पष्ट झालं आहे.