मुख्यमंत्र्यांच्या साताऱ्याला फडणवीसांकडून भोपळा; अर्थसंकल्पानंतर जिल्ह्यात भाजपबद्दल नाराजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । अक्षय पाटील
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधान भवनात सादर केला. शिंदे- फडणवीस सरकारच्या या पहिल्याच अर्थसंकल्पात फडणवीस यांनी अक्षरशः घोषणांचा पाऊस पाडला. यावेळी त्यांनी विविध क्षेत्रासाठी भरगोस निधी दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील असल्याने आणि कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागलेले शिंदे- फडणवीसांचे विश्वासू शंभूराज देसाई हे सुद्धा सातारा जिल्ह्यातूनच येत असल्याने या अर्थसंकल्पात साताऱ्यासाठी भरीव तरतूद करण्यात येईल अशी अपेक्षा जिल्हावासीयांना होती. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पात ही अपेक्षा फोल ठरली. फडणवीसांकडून या बजेट मध्ये सातारा जिल्ह्याला ठेंगा दाखवण्यात आला आहे.

तस पाहिले तर सातारा जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. पश्चिम महाराष्ट्र्रातील एक महत्त्वाचा जिल्हा म्हणून साताऱ्याकडे बघितलं जात. सातारा जिल्ह्याने महाराष्ट्र आणि देशाला मोठमोठे नेते दिले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री असलेले यशवंतराव चव्हाण हे याच जिल्ह्यातील कराडचे.. त्यामुळे यशवंतरावांपासून आत्ताच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत … या जिल्ह्याला कशाचीही कमतरता पडली नाही हा इतिहास आहे. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पत मात्र इतर जिल्ह्यांच्या तुलनेत साताऱ्याच्या तोंडाला मात्र पाने पुसल्याची खंत जिल्ह्यातील जनतेच्या मनात आहे.

ठाकरे सरकारच्या काळात अजित पवार हे राज्याचे अर्थमंत्री होते. त्यावेळी साताऱ्यातून बाळासाहेब पाटील याना कॅबिनेट मंत्रीपद आणि शंभूराज देसाई गृहराज्यमंत्री होते. २०२० मध्ये महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट असूनही अजितदादानी साताऱ्याला नाराज केलं नाही. छत्रपती शिवाजी संग्रहालयाला १२ कोटी, पाटण तालुक्यात १०० खाटांचे रुग्णालय, कराड येथील पाचवड पुलासाठी ४५ कोटींची तरतूद आणि पाचगणीसाठी १०० कोटींची तरतूद त्यावेळी तत्कालीन ठाकरे सरकारकडून करण्यात आली होती. २०२१ च्या अर्थसंकल्पात सातारा सैनिक स्कुलसाठी तब्बल ३०० कोटींचा निधी देण्यात आला होता . तसेच जिल्ह्याला काही वाढीव निधीही दिला होता. याशिवाय तत्कालीन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीही तेव्हा पाटणमधील अनेक कामे मार्गी लावली होती.

२०२२ मध्ये ठाकरे सरकारच्याच अर्थसंकल्पात शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली, सातारा पोलीस दलाने महिला सुरक्षा पथदर्शी उपक्रम राबवला होता. पुढे राज्यभर या उपक्रमाची अमलबजावणी करण्यात आली. याशिवाय अजितदादांनी त्यावेळी वुमन्स हॉस्पिटलच्या आस्थपणाला मंजुरी दिली होती. सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव येथील शाळेस १ कोटी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतापसिंह हायस्कुलला १ कोटी निधी दिला होता.

२०२२ मधेच राज्यातील ठाकरे सरकार कोसळले आणि शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झालं. एकनाथ शिंदे यांची कर्मभूमी जरी ठाणे असले तरी त्यांचं मूळ गाव सातारा जिल्ह्यातील झरे … मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदेंचा सातारा दौराही वाढला होता. अनेकदा त्यांनी आपल्या मूळगावी मुक्काम केल्याचं आपण बघितलं तसेच शेतात काम करतानाचे त्यांचे फोटो सुद्धा व्हायरल झाले होते. त्यामुळे शिंदेंची साताऱ्याशी असलेली ही नाळ पाहता ज्याप्रमाणे काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडचा भरभरून विकास केला त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे सुद्धा या अर्थसंकल्पात काहीतरी ठोस असं जनतेला देतील अशी अपेक्षा होती मात्र वाई येथील विश्वकोश मंडळासाठी नव्या इमारतीची घोषणा वगळता एकही ठोस घोषणा झाली नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेमधून भाजपप्रति नाराजी व्यक्त केली जात आहे.