हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बदलापूर येथील २ चिमुकल्या मुलींवर अत्याचार (Badlapur Case) झाल्याच्या घटनेने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असल्या तरी सदर आरोपीला फाशी देण्याची मागणी वाढत चालली आहे. या घटनेनं राजकीय वातावरण सुद्धा पुन्हा एकदा तापलं आहे. याच एकूण सर्व पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) येत्या २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक (Maharashtra Closed) दिली आहे. आज मुंबईत महाविकास आघाडीची संयुत बैठक पार पडली. यानंतर प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सुद्धा उपस्थित होते.
नाना पटोले म्हणाले, बदलापूरच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राला काळिमा फासला आहे. या घटनेला दाबण्यासाठी सरकारने स्वतः प्रयत्न केला आहे. हि संस्था भाजप आणि आरएसएसची असल्याने त्यांची बदनामी होऊ नये याची काळजी सरकारकडून घेतली जात आहे. महायुतीला या घटनेचं काहीही घेणंदेणं नसून सत्तेची गुर्मी त्यांच्यात आहे. आम्हाला यामध्ये राजकारण करायच नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या, शाहू-फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला काळिमा लावायचा जो प्रयत्न केला जातोय त्याचा आम्ही निषेध करतो. त्याच पार्श्वभूमीवर येत्या २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडी कडून देण्यात आली आहे. या बंद मध्ये महाविकास आघाडी आणि आमचे सर्व मित्रपक्ष सहभागी होणार आहोत. राज्यातील सर्व शाळा, कॉलेज, मुलांचे पालक, दुकानदार, या सर्वानी या बंद मध्ये सहभागी व्हावं आणि महाराष्ट्रातील अकार्यक्षम आणि भ्रष्ट सरकाराला आरसा दाखवायचा प्रयत्न करू असं आवाहन नाना पटोले यांनी केलं.
दरम्यान, बदलापूर घटनेतील नराधमाला आताच्या आता फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. आंदोलनकर्त्यांवर जमाव जमवणे, रेल रोको करणे, स्टेशन परिसरात तोडफोड करणे, पोलिसांवर दगडफेक करणे या कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तब्बल दीड हजारहून अधिक लोकांवर दाखल करण्यात आले. यातील 22 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. कोर्टाने या 22 आंदोलकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.