हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2025 हे नवीन वर्ष सुरु होण्यास काहीच आठवडे उरले आहेत. त्यातच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) देशातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. या निर्णयामध्ये शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या को-लॅटरल फ्री कर्जाच्या मर्यादेत वाढ करत, आरबीआयने आता ही मर्यादा 1.6 लाख रुपयांवरून 2 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे असंख्य शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळाली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्याचा अधिक फायदा होणार आहे.
कोट्यवधी शेतकऱ्यांना फायदा
आरबीआयच्या या निर्णयामुळे देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना फायदा होणार असून, भांडवलाच्या अभावामुळे शेतीच्या कामांमध्ये होणाऱ्या अडचणी दूर होऊन , व्यवसायाला चालना मिळणार आहे . शेतकऱ्यांना आता कोणतेही तारण ठेवण्याची गरज न पडता शेतीसाठी 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेता येणार आहे. त्यामुळे शेतकरी सहजपणे आपला व्यवसाय प्रगती पथावर घेऊन जाऊ शकतात.
को-लॅटरल फ्री कर्जासाठी व्याज
या महत्वपूर्ण निर्णयामुळे शेतकऱ्यांना पीक लागवड, बी-बियाणे खरेदी, भाज्या व फळांची शेती, दूध व मांस उत्पादनासाठी तसेच साठवणुकीसाठी गोदाम बांधकाम, आणि सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी कर्ज उपलब्ध होणार आहे. ज्यामुळे आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होईल. या को-लॅटरल फ्री कर्जासाठी फक्त 7% दराने व्याज आकारले जाईल. सगळ्यात महत्वाचे म्हणजे, जर शेतकऱ्यांनी कर्ज वेळेत परत केले, तर त्यांना 3% व्याज सवलत मिळणार असून , ज्यामुळे प्रत्यक्ष व्याज दर केवळ 4% होतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा जास्त नफा होतो.
निर्णय घेण्यामागचे कारण
शेतीमधील वाढत्या उत्पादन खर्च आणि महागाईचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांकडे तारण ठेवण्यासाठी मालमत्ता नसते, ज्यामुळे त्यांना कर्ज घेता येत नाही. आता तारणाशिवाय उपलब्ध होणारे कर्ज शेतकऱ्यांच्या उत्पादन व उत्पन्नवाढीत महत्त्वाची भूमिका बजावेल. यामुळे देशातील कृषी क्षेत्रात सकारात्मक बदल घडताना दिसणार आहे.