Maharashtra Heatwave| सध्या राज्यामध्ये उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागत आहे. मार्चच्या सुरुवातीलाच तापमानात झपाट्याने वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, विदर्भातील नागपूर, अकोला, चंद्रपूर, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंशांपेक्षा जास्त जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्य कामांसाठीच घराच्या बाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.
विदर्भात उष्णतेच्या लाटेचा धोका(Maharashtra Heatwave)
भारतीय हवामान विभागाने (IMD) विदर्भातील काही भागांत ११, १२ आणि १३ मार्च रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. यामध्ये अकोला आणि चंद्रपूर येथे तापमान सर्वाधिक राहण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, यंदा तापमान सरासरीपेक्षा ३ ते ४ अंशांनी अधिक राहील, त्यामुळे उन्हाळ्याची तीव्रता अधिक जाणवेल.
दुसऱ्या बाजूला विदर्भासोबतच मुंबई, ठाणे, रायगड, पुणे आणि नंदुरबार या भागांमध्येही तापमान झपाट्याने वाढले आहे. मुंबईत ३७.२ अंश, ठाण्यात ३८ अंश, कोलाबामध्ये ३६.४ अंश, पुण्यात कोरेगाव पार्क परिसरात ३९.६ अंश, तर नंदुरबारमध्ये ३९.५ अंश तापमानाची नोंद झाली आहे. या उष्णतेमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता जाणवत आहे. यासह उष्माघात आणि आरोग्याच्या इतर समस्या जाणवण्यास सुरुवात झाली आहे.
तापमानाचा कहर कायम (Maharashtra Heatwave)
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस उन्हाचा तडाखा कायम राहणार आहे. विशेषतः विदर्भातील काही ठिकाणी तापमान ४२ अंशांपर्यंत पोहोचू शकते. वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचा सल्ला दिला जात आहे. लहान मुले, वृद्ध आणि आरोग्याच्या समस्या असलेल्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
उन्हाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्याल?
- शक्यतो दुपारी १२ ते ४ दरम्यान घराबाहेर जाणे टाळा.
- भरपूर पाणी प्या आणि शरीर हायड्रेट ठेवा.
- हलके, सैलसर आणि हवेशीर कपडे परिधान करा.
- डोक्यावर टोपी घाला किंवा छत्रीचा वापर करा.
- थंड पदार्थ, ताजे फळे आणि पाणीदार पदार्थांचे सेवन वाढवा.
दरम्यान, उन्हाचा तडाका लक्षात घेऊन नागरिकांनी योग्य उपाय योजना राबवाव्यात. तसेच, हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे. (Maharashtra Heatwave) त्याचबरोबर, आरोग्याबाबत कोणतेही समस्या जाणवत असल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.