आता तुमचेच विसर्जन करण्याची वेळ आली आहे, शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | साताऱ्यात गणपती विसर्जनाच्या मुद्द्यावरून खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातील वाद चांगलाच चिघळला आहे. ‘आता तुमचेच विसर्जन करण्याची वेळ आली आहे’ असा खोचक टोला आ. शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंना लगावून नव्या वादाला तोंड फोडले आहे.

ज्या महापालिकेत उदयनराजेंची एकहाती सत्ता आहे त्याच पालिका प्रशासनाने न्यायालयाचे आदेश पाळण्याचा निर्णय घेतला असून मंगळवार तळ्यात विसर्जन करण्यास बंदी केली आहे. यापार्श्वभूमीवर ‘जास्त फुशारक्या मारू नका. कारण, सातारा पालिकेनेच तुमचे नाक कापले आहे‘ असे म्हणून शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंना टार्गेट केले आहे.

‘मला माझी पायरी चांगल्याप्रमाणे ठाऊक आहे. पायर्‍या उतरताना आणि चढताना माझा कधी तोल गेला नाही आणि जाणारही नाही. कोणाला कोणत्या पायरीवर ठेवायचे हे सातारकर ठरवतीलच. पण, पायर्‍या चढताना, उतरताना कोणाच्या कमरेवरची पँट खाली घसरते आणि कोणाचा तोल सुटतो, हे सातारकरांनाही माहिती आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या पायर्‍या मोजा. बाप्पांचे विसर्जन मंगळवार तळ्यात होऊ शकले नाही. पण, तुमच्या विसर्जनाची वेळ आता जवळ आली आहे. लवकरच जनताच तुमचे विसर्जन करेल’ असा इशाराही आ. शिवेंद्रराजे यांनी यावेळी खा. उदयनराजे भोसले यांना दिला आहे.

विसर्जनाचा प्रश्‍न निर्माण करुन नागरिकांना, गणेश मंडळांना आणि जिल्हा प्रशासनाला वेठीस धरुन तुम्ही काय मिळवले? केवळ थापेबाजी आणि डायलॉगबाजी करुन प्रश्‍न सुटत नसतात, हे तुम्ही पुन्हा एकदा सिध्द केले आहे. सातारा पालिकेनेच तुम्हाला तोंड दाखवायला जागा ठेवली नसून पालिकेने मंगळवार तळ्यात विसर्जनास बंदी केली असल्याने तुमचे नाकच कापले गेले. त्यामुळे तुमचा तिळपापड होत असून तुमचे मानसिक संतुलन ढळत चालले आहे असेही शिवेंद्रराजेंनी म्हटले आहे.

तुमची थापेबाजी, भंपकगिरी आणि ड्रामेबाजी आता लोकांना कळून चुकली आहे. हळूहळू तुमचा खरा चेहरा जनतेसमोर येत आहे आणि हे जास्त दिवस चालणार नाही. तुमच्या लहरीपणामुळे विसर्जनाची काय परिस्थिती झाली? ज्या मंगळवार तळ्यात विसर्जन होत होते ते तुम्ही मायलेकरांनी बंद पाडले आणि आता त्याच तळ्यात विसर्जन करण्याचा अट्टाहास करुन ‘हम करे सो कायदा’ करण्याचा प्रयत्न तुम्ही केला. मी कोणीतरी वेगळा आहे, हे दाखवण्याचा तुमचा स्टंट तुमच्याच अंगलट आला आहे. असेही शिवेंद्रराजेंनी पत्रकात म्हटले आहे.

Leave a Comment