वडील ST मध्ये कामाला; मुलगा २४ व्या वर्षी झाला नायब तहसीलदार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक आईवडील आपली अर्धवट राहिलेली स्वप्ने आपल्या मुलांकडून पूर्ण व्हायची ईच्छा बाळगून असतात. पण बऱ्याचदा मुलांना त्यामध्ये रस नसतो किंवा त्यांच्या आवडी वेगळ्या असतात. नाशिकच्या शुभम मदाने याचे मात्र थोडेसे वेगळे आहे. त्याच्या वडिलांनी कधी स्वतःची स्वप्ने त्याच्यावर लादली नाहीत. मात्र त्याने लहानपणापासूनच वडिलांनी पाहिलेले उच्चशिक्षणचे स्वप्न पाहायला सुरुवात केली. आणि वडिलांनी देखील त्याच्या प्रत्येक प्रयत्नात त्याला साथ द्यायला सुरुवात केली. स्वतःच्या ईच्छा आकांक्षा बाजूला सारत मुलाच्या स्वप्नासाठी मेहनत त्यांनी सुरु ठेवली. आणि शुभमने वडिलांचा विश्वास सार्थ ठरवित पहिल्याच प्रयत्नात वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी नायब तहसीलदार पदी आपले नाव निश्चित केले आहे.

शुभमचे वडील राजेश मदाने हे एसटी मध्ये मेकॅनिक आहेत. त्यांनाही अधिकारी व्हायचे होते मात्र ते शक्य झाले नाही. मात्र लहानपणीच शुभमने अधिकारी व्हायचे निश्चित केले. त्यानंतर त्याने दुसरे कोणतेच स्वप्न पाहिले नाही.  चौथीत असल्यापासूनच स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या भूगोल आणि इतिहास विषयाचा अभ्यास त्याने सुरु केला होता. दहावीला ९४% गुण मिळवीत त्याने त्याची हुशारी सिद्ध केली. बारावीतही विज्ञान शाखेत ८४% गुण मिळवीत आपल्या यशातले सातत्य त्याने राखले. पदवीचे शिक्षण घेत असताना त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धेची तयारी करण्यास सुरुवात केली होती.

हा अभ्यास करत असतानाच मागच्या ३ वर्षात त्याने राज्यसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. २०१९ मध्ये पहिल्यांदाच त्याने ही परीक्षा दिली आणि पहिल्या प्रयत्नातच त्याने हे यश मिळविले. आई वडिलांना त्याच्या या यशामुळे आपल्या आजवरच्या कष्टाचे चीज झाल्याचे वाटते आहे. सलग अठरा तास तो अभ्यास करत असे असे त्यांनी सांगितले. मुलाची धडपड बघून वडिलांनी देखील त्याला कोणतीच कमी पडू दिली नाही. आपले शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करीत मोठ्या अधिकारी झालेल्या मुलाचे त्यांना कौतुक वाटते आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment