राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ जागांसाठी ‘या’ नावांची चर्चा; महाविकास आघाडीकडून कुणाला मिळणार आमदारकीचं तिकीट?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ जागांसाठी महाविकास आघाडी १२ नावांच्या यादीवर गुरुवारी मंत्रिमंडळात चर्चा करण्यात येणार आहे. एप्रिल महिन्यात विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागा रिक्त झाल्या होत्या. या १२ नावांच्या शिफारशीची यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या मंत्रिमंडळाकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवण्यात येईल. विधान परिषदेच्या १२ जागांसाठी सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याकडे इच्छुकांची बरीच मोठी रांग आहे. यात सर्वाधिक राष्ट्रवादीकडे ३००, काँग्रेसकडे ५० आणि शिवसेनेकडे १५ जणांनी विधान परिषदेच्या जागेसाठी फिल्डिंग लावली आहे. तिन्ही पक्षाच्या सहमतीनुसार प्रत्येक पक्षाला ४ जागा वाट्याला येणार आहेत. त्यामुळे या जागांवर कोणत्या नावाची शिफारस करायची याचं आव्हान पक्षनेतृत्वासमोर असणार आहे.

शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर, माजी मंत्री सचिन अहिर, माजी आमदार सुनील शिंदे, युवा सेनेचे राहुल कनाल, विजय करंजीकर, भाऊसाहेब चौधरी, नितीन बानगुडे पाटील आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या नावाची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांच्या यादीत सर्वप्रथम अलीकडेच भाजपाला रामराम करुन आलेले एकनाथ खडसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, उत्तमराव जानकर, शिवाजीराव गर्जे, आदिती नलावडे, गायक आनंद शिंदे, श्रीराम शेटे यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी विधान परिषदेच्या २ जागा रिक्त झाल्यानंतर राष्ट्रवादीने आदिती नलावडे, शिवाजीराव गर्जे यांच्या नावाची शिफारस राज्यपालांकडे केली होती, मात्र अद्याप त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.

तर काँग्रेसकडून प्रवक्ते सचिन सावंत, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, माजी आमदार मोहन जोशी, माजी मंत्री नसीम खान यांचा समावेश आहे. राज्यपालांनी विधान परिषदेच्या जागांबाबत निर्णय न घेतल्याने सत्ताधारी पक्ष नाराज आहे. परंतु राज्य सरकारकडून शिफारस झाली नसल्याचं स्पष्टीकरण राजभवनाकडून देण्यात आलं आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिच्या नावाची शिफारसही विधान परिषदेच्या जागेसाठी करण्यात येऊ शकते, मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर उर्मिलाने भाजपाच्या गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती, मात्र त्या निवडणुकीत उर्मिलाचा पराभव झाला होता.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment