राज्यांतर्गत रेल्वे सेवा तर सुरु झाली पण गाडयांची संख्या कधी वाढवणारं ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर । मध्य रेल्वेने राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली असून तसे राज्य सरकारला कळवण्यात आले आहे. आज २ सप्टेंबरपासून रेल्वेचे बुकिंग सुरू करण्यात येणार आहे. मात्र, ट्रेनची संख्या कमी असल्यानं विदर्भातील प्रवाशांची मात्र निराशा झाली आहे. अनलॉक-४ टप्प्यात राज्य सरकारने राज्यांतर्गत प्रवासाला परवानगी दिल्याने आता रेल्वेने मुंबई किंवा पुणे गाठता येईल असे वाटत असेल तर ते मात्र खरे नाही कारण सध्याच्या परिस्थितीत नागपूरवरून पुण्यासाठी एकही गाडी नाही, तर मुंबईसाठी आठवड्यातून फक्त एक गाडी आहे. त्यामुळे विदर्भातील रेल्वे प्रवाशांना या परवानगीचा तसा फारसा उपयोग नाही.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रेल्वेने २३ मार्चपासून प्रवाशी रेल्वे सेवा पूर्ण बंद होती. मात्र मे महिन्यापासून काही विशेष गड्या सुरू करण्यात आल्या आहेत. आजवर राज्यांतर्गत प्रवासावर बंदी असल्याने विदर्भातून मुंबईला जायचे असेल तर रेल्वेचे तिकीट मिळू शकत नव्हते. खूपच तातडीचे असल्यास एक तर विमान किंवा मग रेल्वेने नागपूरपासून जवळ असलेल्या पण मध्यप्रदेशात असलेल्या इटारसीला रेल्वेने जायचे व तेथून मुंबईचे तिकीट काढायचे, असा फेऱ्याने प्रवास करावा लागतो.

दरम्यान, २ सप्टेंबरपासून राज्यांतर्गत प्रवासावरील बंदी उठल्याने राज्यांतर्गत प्रवासाची तिकीट विक्री रेल्वेतर्फे सुरू करण्यात आली. मात्र रेल्वेने अजून नियमित गाड्या सुरू केल्या नसल्याने मुंबई, पुण्याचे तिकीट काढू इच्छिणाऱ्यांच्या पदरी निराशाच आली. सध्या ज्या विशेष गाड्या धावत आहेत त्यात मुंबईसाठी फक्त हावडा- मुंबई मेल ही एकमेव गाडी आहे व तीही आठवड्यातून एकदाच आहे. आधी ही गाडी दररोज होती मात्र प्रतिसाद नसल्याने जूनमध्ये ती आठवड्यातून एकदा करण्यात आली. त्याचप्रमाणे पुण्यासाठी तर एकही गाडी नाही. त्यामुळे पुण्याला जायचे असल्यास एक तर विमान सेवा किंवा मग एसटीने सुरू केलेल्या शिवशाही बसने जाता येऊ शकते. त्यामुळे रेल्वेच्या राज्यांतर्गत तिकीट विक्री सुरू होण्याचा विदर्भातून पुण्या- मुंबईला जणाऱ्यांना कुठलाही फायदा झाला नसल्याची भावना प्रवाशांमध्ये आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment