राज्यात काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढण्याची चिन्हं हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहेत. प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा इशारा दिला आहे. त्यानुसार, 7 ते 10 जून या कालावधीत पावसाची सुरुवात होऊन 13 ते 18 जून दरम्यान राज्यभरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.
जूनमध्ये शेतीसाठी पोषक हवामान
यंदा राज्यात जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच काही भागांमध्ये समाधानकारक पाऊस झाला आहे. डख यांच्या म्हणण्यानुसार, जूनच्या शेवटपर्यंत राज्यातील बहुतांश भागात पेरणीसाठी योग्य स्थिती तयार होईल. आतापर्यंत सरासरी 350 मिमी पर्यंत पावसाची नोंद झाली आहे, त्यामुळे जमिनीत ओल चांगली निर्माण झाली आहे. हे लक्षात घेता, पेरणी लवकर करण्यास हरकत नाही, पण शेतकऱ्यांनी आपल्या भागातील स्थानिक हवामानाचा विचार करून निर्णय घ्यावा, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
कोणत्या तारखांना पाऊस पडणार?
हवामान अभ्यासक डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार पुढीलप्रमाणे पावसाची शक्यता आहे. 7 ते 10 जून: हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस अनेक भागात पडण्याची शक्यता आहे. 13 ते 18 जून ला अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचीस शक्यता असून काही ठिकाणी ओढे व नाले वाहण्याची शक्यता आहे.
पावसाचा जोर कुठे सर्वाधिक?
डख यांच्या विश्लेषणानुसार, पुढील जिल्ह्यांमध्ये विशेष सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे:
कोकण व पश्चिम महाराष्ट्र
मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर
या भागांमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाचा जोर अधिक राहणार आहे.
मराठवाडा
लातूर, नांदेड, बीड, धाराशीव, सोलापूर, परभणी, हिंगोली
या भागातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, अन्नधान्य पिकांसाठी हा काळ महत्त्वाचा ठरणार आहे.
उत्तर महाराष्ट्र
नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव
येथेही मोठ्या प्रमाणात पाऊस होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी जमिनीची तयारी करून ठेवावी.
विदर्भ
अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा
विदर्भातही 13 ते 18 जूनदरम्यान मुसळधार पाऊस होणार असून, शेतकऱ्यांनी याच काळात पेरणी करण्याचा विचार करावा.
प्रशासन आणि नागरिकांसाठी सूचना
डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार काही भागांत अतिवृष्टीमुळे ओढे , नाले वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने योग्य ती तयारी ठेवावी आणि नागरिकांनी गरजेचे काळजीचे उपाय करावेत.
डख यांचा शेतकऱ्यांना सल्ला
“राज्यातील बहुतांश भागांमध्ये जून महिन्याच्या शेवटपर्यंत पेरणीसाठी पोषक हवामान तयार होणार आहे. मात्र, प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या भागातील हवामान परिस्थिती, जमिनीची ओल आणि पाण्याची उपलब्धता पाहूनच पेरणीचा निर्णय घ्यावा. कोणतीही घाई करून नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी.” राज्यातील शेतकरी बांधवांसाठी हा काळ अत्यंत निर्णायक ठरणार आहे. योग्य हवामान, पुरेशी ओल आणि संभाव्य पावसाचा विचार करता, या आठवड्यात शेतकामांना गती देणे योग्य ठरेल. हवामान विभागाचे अद्ययावत अपडेट्स वेळोवेळी घेत राहा आणि शाश्वत शेतीसाठी योग्य नियोजन करा.




