हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Maharashtra Rain Updates । अखेर मान्सून महाराष्ट्रात पूर्णपणे सक्रिय झाला आहे. राज्यातील जवळपास सर्वच भागात पावसाची रिमझिम बघायला मिळतेय. हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील 48 तासांत अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे . हा इशारा खास करून कोकण किनारपट्टीवर म्हणजेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, मुंबईसह विदर्भ घाटमाथ्यावरही वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोणत्या जिल्हयाला कोणता अलर्ट- Maharashtra Rain Updates
हवामान विभागाने रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक घाटमाथा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्याला येलो अलर्ट मिळाला आहे. तर विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली मध्ये विजांसह वादळी पावसाची शक्यता (Maharashtra Rain Updates) वर्तवण्यात आली आहे.
मुंबईत मुसळधार पाऊस –
दरम्यान, मुंबईसह उपनगरात रात्रभर पावसाची बॅटिंग (Maharashtra Rain Updates) सुरु आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक सखल भागांत रस्त्यांवर पाणी साचले आहे. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि जलमय रस्त्यांमुळे चाकरमान्यांना कामावर पोहोचण्यास उशीर होण्याची शक्यता आहे. कारण मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल उशिराने सुरु आहे. मुंबईतील पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने सुरु आहे. त्यासोबतच ईस्टर्न हायवे, वेस्टर्न हायवेसह सर्व वाहतूक सुद्धा अतिशय संथ गतीने सुरू आहे.