महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या रौप्य महोत्सवी वर्षाची सांगता , अत्याचार पीडित महिलांसाठी स्नेहालय संस्थेच्या सहकार्याने ‘सक्षमा’ या प्रकल्पाचा शुभारंभ
मुंबई प्रतिनिधी । बदलत्या समाज व्यवस्थेत महिला काळानुरूप बदलल्या मात्र पुरुष नाही, कारण ते त्यांच्या सोयीचे नाही, महिलांना जमिनीच्या मालकी हक्कापासून दूर ठेवणे पुरुषी मानसिकतेचा सांस्कृतिक कट होता अशा परखड शब्दात ख्यातनाम लेखिका मंगला गोडबोले यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वर्धापन दिनी समाजातील महिलांच्या स्थितीबाबत आपले विचार मांडले.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या रौप्य महोत्सवी वर्षाची सांगता काल झाली. या निमित्ताने अत्याचार पीडित महिलांसाठी आयोगाने नगरस्थित स्नेहालय संस्थेच्या सहकार्याने ‘सक्षमा’ या प्रकल्पाचा शुभारंभ केला. तसेच शासनाच्या विविध योजना, आयोगाचे कार्य – उपक्रम समजावे यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या डिजिटल किऑस्क, हेल्पडेस्क आणि सुधारित वेबसाइटचे उदघाटन याप्रसंगी करण्यात आले.
आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, आयोगाच्या सदस्या गयाताई कराड, विंदा कीर्तिकर, देवयानी ठाकरे, सदस्य सचिव डॉ मंजुषा मोळवणे, स्नेहालयचे प्रमुख डॉ. गिरीश कुलकर्णी, लेखिका मंगला गोडबोले, आम्ही उद्योगिनीच्या मीनल मोहाडीकर, विविध समाजसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थितीत आयोगाच्या २६ वा वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला.
यावेळी प्रसिद्ध लेखिका मंगला गोडबोले यांचे ‘सती ते सरोगसी: वेध महिला विषयक कायद्यांचा’ यावर आपले विचार व्यक्त केले. त्या म्हणाल्या कि, महिला काळानुरुप बदलल्या मात्र पुरुष नाही बदलले, कारण होणारे बदल सोयीचे नाहीत. अनेक दशक महिलांना जमिनीच्या वंचित ठेवण्यात आले असं करण हे पुरुषी मानसिकतेचा सांस्कृतिक कट होता. पुरुषांनी जमिनीत संपत्ती निर्माण केली, ज्यात महिलांना रस निर्माण होऊ दिला नाही. सरोगसी, लिव्ह इन रिलेशनशिप ही सध्याची सर्वात मोठी आव्हाने आहेत. अशा गोष्टींचा मी पुरस्कार करत नाही पण धिक्कार ही नाही कारण बदलत्या युगात स्त्री पुरुष संबंधांचे आयाम बदलत आहेत. या सगळ्यांसाठी ठोस कायदे होणं काळाची गरज आहे. विवाह विषयक वेगवेगळे कायदे असूनही महिलांची ससेहोलपट थांबली नाही, मग सरोगसी आणि लिव्ह इन बाबत तर कायदेच नाहीत मग त्यांची किती ससेहोलपट होईल? अशा संकल्पनात त्यांची सुरक्षितता जपणे ही महत्वाचे आहे असे ही त्या म्हणाल्या.
यावेळी बोलताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रहाटकर म्हणाल्या कि, महिला आयोग हा महिला परिवार आहे. स्त्रीचे हक्क त्यासोबतच कुटुंब महत्वाचे, कुटुंबाचा कणा स्त्री आहे त्यामुळे तिचे प्रश्न, भावना महत्वाच्या आहेत. गेल्या काही वर्षात आयोग जिल्हा ते राष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहे. महिला आयोग आपल्या दारी सारख्या उपक्रमातून जिल्हा पातळीवर महिलांचे प्रश्न सोडवणे तर एनआरआय, मानवी तस्करी सारख्या आंतरराष्ट्रीय परिषदातून बदलत्या प्रश्नांबाबत चर्चा करणे, शासनाला निश्चितीत सहकार्य करणे अशा बाबी आयोग करत आहे. स्नेहालयच्या सहकार्याने आज शुभारंभ झालेल्या सक्षमा केंद्रातून पीडित महिलांना न्याय, आत्मविश्वास देऊन पुन्हा उभं करण्यात येईल. आयोगातील हेल्पडेस्क आणि डिजिटल किऑस्कमुळे इथे येणाऱ्या महिलांच्या न्यायाची प्रक्रिया सुलभ करण्यासोबतच त्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती एका क्लिक वर मिळणार आहे. आयोग कार्यालयात महिला येतात त्यांना न्याय, हक्क आयोग गेली २५ वर्ष मिळवून देत आहे, मात्र जागरूकता निर्माण होऊन, समाज मानसिकतेत बदल होऊन या तक्रारींची पुढे संख्या कमी व्हावी आणि पर्यायाने समाज घडावा असे वाटते असे ही त्या म्हणाल्या.
स्नेहालयचे संस्थापक डॉ.गिरीश कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात आयोगाने सक्षमा केंद्रासाठी घेतलेल्या पुढाकाराबाबत आभार मानले. स्नेहालय आणि आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या सक्षमा केंद्रात बलात्कार, लैंगिक अत्याचार, घरगुती हिंसाचार, कुमारी माता यासारख्या पीडित महिलांना कायदेशीर सल्ला,मानसिक आधार देणे, संकटग्रस्त महिलांची मदत करणे आदी उपक्रम या योजनेत असतील. त्यासाठी हेल्पलाइन देखील सुरु केली जाणार आहे. या केंद्रातून पीडित महिलांचे पुनर्वसन शक्य होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Nice initiative !
Maharashtra Women’s Commission team led by @VijayaRahatkar tai launch an initiative called ‘Sakshama’ in association with Snehalay, for complete support to women affected by harassment.
My greetings to MSWC on completing Silver Jubilee ! https://t.co/r34MwPTkXT— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 25, 2019