औरंगाबाद प्रतिनिधी । यंदाच्या अवकाळी पावसाचा सर्वात मोठा फटका मराठवाड्याला बसला. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांना मदत मिळण्याची अपेक्षा होती. त्या नुसार मराठवाड्याला राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईचा पहिला हप्ता म्हणजेच ८१९ कोटी मिळाले होते. पहिला हप्ता देण्याची तरतूद केल्यानंतर १३ डिसेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील १७९१ कोटी रुपयांचे अनुदान विभागाला देऊ केले आहे.१३ नोव्हेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयाने शासनाला २९०४ कोटी रुपयांच्या निधीची मागणी करणारा अहवाल दिला होता. त्यात पुन्हा ४५० कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी केली. ३३५० कोटींपैकी आजवर २६८२ कोटी विभागाला अनुदान प्राप्त झाले आहे.
दरम्यान राज्यातील ३४ जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात दोन हजार ५९ कोटी ३६ लाख रुपयांची मदत जाहीर झाली होती. या मदतीच्या रकमेतून बँकेने कोणतीही इतर वसुली न करण्याचे आदेश आहेत. प्रत्येकी दोन हेक्टरपर्यंत मदत करण्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये ४१ लाख ४९ हजार १७५ हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे आणि बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शासकीय स्तरावर निर्णय झाला. त्यानंतर मदतीच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्याचे शासनादेश निघाले होते. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा मिळणार आहे.