सहकारामुळेच महाराष्ट्राची प्रगती झाली : अशोकराव थोरात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
महाराष्ट्रात स्वातंत्र्यानंतर सर्व क्षेत्रात सहकार चांगला रुजला, वाढला व त्यामुळे गरीब शेतकरी व बहुसंख्य जनतेची प्रगती झाली. पर्यायने सहकारामुळेच महाराष्ट्राची प्रगती झाली. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, छोटे बलुतेदार, व्यवसायिक, मेंढपाळ, पशुपालक इत्यादी सर्व घटकांना सहकारामुळे देशाच्या प्रगतीचा लाभ मिळाला. त्याचबरोबर मध्यमवर्ग व वरचा मध्यमवर्ग यांनाही सहकार क्षेत्राच्या माध्यमातून भांडवल उभारणीपासून उद्योग व्यवसाय उभारता आला. परंतु या सहकार क्षेत्राची प्रगती थांबून पठारावस्था व अधोगतीकडे वाटचाल होतेय काय? अशी शंका येऊ लागलीय. सहकार क्षेत्र फार मोठे असून त्यातील काही घाण वेळीच काढली तर स्वच्छ, पारदर्शक  पवित्र राहील असे मत शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी व्यक्त केले.

मळाई ग्रुप मलकापूर- कराड आणि कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थशास्त्र राज्य विचारमंच यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा. डाॅ. शरद शेटे हे होते. यावेळी उपनिबंधक सहकारी संस्था कराडचे संदिप जाधव, प्रमुख वक्ते प्राचार्य जे. के. पवार, प्रा. डॉ. लालासाहेब घाटगे, प्रा. डॉ. अनिल वावरे, प्रा. डॉ. नेताजी पवार, मलकापूर नगरपालिका विरोधी पक्षनेते अजित थोरात, सौ.अरूणादेवी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डाॅ. शरद शेटे यांनी अध्यक्षीय भाषणात सहकार क्षेत्रातील राजकारण, सहकारातील भ्रष्टाचार, सहकारी कारखाने, सहकारातील घराणेशाही यांची सद्यस्थिती मांडली. वक्ते प्राचार्य डॉ. जे. के. पवार यांनी जागतिक स्तरावरील सहकारी चळवळीचा आढावा घेऊन जागतिकीकरणामध्ये सहकारी चळवळीचे असणे, टिकणे व वाढणे का गरजेचे आहे? याचा उहापोह केला. वक्ते प्रा. डाॅ. लालासाहेब घाटगे यांनी आपल्या भाषणामध्ये सहकाराची तत्वे समजावून दिली. सभासदांची कर्तव्ये, सहकार क्षेत्रातील सर्व घटकांना प्रशिक्षण देणे व सहकारांतर्गत सहकार वाढवणे, ते कसे वाढवणे आवश्यक आहे. याची माहिती दिली. विशेषता सहकार क्षेत्राची सामाजिक बांधिलकी त्यांनी समजावून दिली.
सहकारी संस्था कराडचे उपनिबंधक संदीप जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालय अर्थशास्त्र राज्य विचारमंचचे समन्वयक सतिश जंगम यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.शीला पाटील यांनी केले. प्रा. रामकृष्ण पाटील यांनी आभार मानले.