MahaRERA : महाराष्ट्रात रिअल इस्टेट क्षेत्रात पारदर्शकता आणि शिस्तबद्धता आणण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला आहे. महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (MahaRERA) सोबत नोंदणीकृत रिअल इस्टेट एजंटांची संख्या ५०,००० चा टप्पा ओलांडून आता ५०,६७३ वर पोहोचली आहे. ही संख्या रिअल इस्टेट व्यवसायतील वाढत्या व्यावसायिकतेचे आणि ग्राहक जागरुकतेचे प्रतीक मानली जात आहे.
या नोंदणीकृत एजंटांपैकी सध्या ३१,९८० एजंट सक्रिय आहेत, तर १८,६९३ एजंटांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. ही रद्दीकरणे बहुतेक वेळा अनिवार्य प्रशिक्षण पूर्ण न करणे, नोंदणी नूतनीकरण न करणे किंवा MahaRERA च्या नियमानुसार काम न करणे या कारणांमुळे झाली आहेत.
कोणत्या विभागात किती एजंट ?
राज्यातील कोकण विभाग, ज्यामध्ये मुंबई महानगर क्षेत्र (MMR) समाविष्ट आहे, तो नोंदणीच्या बाबतीत आघाडीवर असून येथे २१,०५० एजंट आहेत. पुणे विभागात ८,२०५ एजंट नोंदणीकृत आहेत. याखेरीज नागपूरमध्ये १,५०४, उत्तर महाराष्ट्रात ४९०, संभाजीनगरमध्ये ३४३ आणि अमरावतीमध्ये २३७ एजंट कार्यरत आहेत. ही आकडेवारी स्पष्ट करते की महाराष्ट्रातील प्रॉपर्टी व्यवसायाचे मुख्य केंद्र अजूनही मुंबई आणि पुणेच आहे.
एका इंग्रजी माध्यमाशी बोलताना MahaRERAच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे एजंट हे घर खरेदी करणाऱ्यांसाठी सुरुवातीचा आणि महत्त्वाचा दुवा असतात. एजंट केवळ व्यवहार पूर्ण करत नाहीत तर ग्राहकांना मॉडेल सेल अॅग्रीमेंट, कार्पेट एरिया, दोष उत्तरदायित्व कालावधी, अलॉटमेंट लेटर इत्यादी महत्त्वाच्या बाबींबाबत मार्गदर्शन करतात. यामुळे व्यवहारात पारदर्शकता निर्माण होते आणि ग्राहक सुज्ञ निर्णय घेऊ शकतात.
इतर राज्यातूनही एंट्री
फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देशातील इतर भागांतील एजंट्सदेखील MahaRERAसोबत नोंदणी करत आहेत. दिल्ली, बेंगळुरू, हैदराबाद, गुरुग्राम, अहमदाबाद, गोवा, पटणा, प्रयागराज आणि जम्मू या १५० हून अधिक शहरांतील एजंट्सने MahaRERAमध्ये नोंदणी केली आहे. ही बाब महाराष्ट्राच्या रिअल इस्टेट क्षेत्राची विश्वासार्हता अधोरेखित करते.
सोन्याच्या दरात मोठी घसरण; ग्राहकांना खरेदीची संधी
प्रमाणपत्र अनिवार्य
MahaRERAने सर्व एजंटांसाठी प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. अशा अनेक एजंटांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे जे या नियमांचे पालन करू शकले नाहीत. हे नियम ग्राहक संरक्षणाच्या दृष्टीने आवश्यक असल्याचे MahaRERAने स्पष्ट केले आहे. अधिकृतांनी सांगितले की, प्रमाणीकृत एजंटांची संख्या वाढल्याने रिअल इस्टेट व्यवहार अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक आणि ग्राहकहिताचे होणार आहेत.
नवीन धोरणांमुळे एजंटांच्या कामात अधिक व्यावसायिकता आणि विश्वासार्हता येणार आहे. ग्राहक आता अधिक माहितीच्या आधारे निर्णय घेऊ शकतील आणि अशा प्रकारे MahaRERAचे उद्दिष्ट एक सुरक्षित, विश्वासार्ह आणि पारदर्शक रिअल इस्टेट बाजारपेठ पूर्णत्वाकडे जाताना दिसत आहे.




