MahaRERA कडून 20,000 रियल इस्टेट एजंटची नोंदणी रद्द ; काय आहे कारण ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

MahaRERA : मालमत्ता किंवा घरे खरेदी करताना होणारे अनेक फसवणुकीचे प्रकार पाहता हे प्रकार रोखण्यासाठी MAHARERA कडून अनेक महत्वाची पावले उचलण्यात आली आहेत. केवळ विकासकांनाच नाही तर इस्टेट एजंटांना देखील नियम लागू करण्यात आले आहेत. या वर्षीपासून एजंटांना पशिक्षण घेणे, परीक्षा उत्तीर्ण करणे आणि नियामकाने तपशीलवार नमूद केल्यानुसार त्यांचे प्रमाणपत्र नोंदणी करणे बंधनकारक आहे. शिवाय वेबसाईटवर प्रमाणपत्रांची नोंदणी देखील बंधनकारक करण्यात आली आहे. महरेराचे हेच नियम पळाले नसल्यामुळे महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण म्हणजेच (MahaRERA) ने 20,000 रियल इस्टेट एजंटची नोंदणी रद्द केली आहे.

नोंदणी वर्षभरासाठी रद्द (MahaRERA)

खरेतर 1 जानेवारी, 2024 पासून, रिअल इस्टेट एजंटना प्रशिक्षण घेणे, परीक्षा उत्तीर्ण करणे आणि नियामकाने तपशीलवार नमूद केल्यानुसार त्यांचे प्रमाणपत्र नोंदणी करणे बंधनकारक आहे, असे न झाल्यास ते व्यवसाय करणे सुरू ठेवू शकणार नाहीत असे महारेरा कडून सांगण्यात आले होते. तरीदेखील नियमांची पूर्तता न झाल्यामुळे महरेरा कडून निर्णय घेऊन अखेर वीस हजारांहून अधिक एजंटांची नोंदणी वर्षभरासाठी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे रियाल इस्टेट एजंटांची चांगलीच गोची झाली आहे. मात्र महारेरा कडून अशा एजंटांना एक संधी देखील देण्यात आली असून जर त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले, सक्षमतेचे प्रमाणपत्र प्राप्त केले आणि ते एका वर्षाच्या आत पोर्टलवर अपलोड केले, तर त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण केले जाईल असे महारेराने (MahaRERA) म्हंटले आहे. जे विहित मुदतीत प्रक्रियेचे पालन करणार नाहीत, त्यांची नोंदणी वर्षभरानंतर रद्द केली जाईल.

यापूर्वीही एजंटांची नोंदणी रद्द

त्यानंतर, पुढील सहा महिन्यांसाठी, ते नवीन नोंदणीसाठी अर्ज करू शकणार नाहीत, ज्याचा अर्थ स्थावर मालमत्तेचे व्यवहार करता येत नाहीत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल.याबाबत माहिती देताना महारेराच्या एका अधिकाऱ्याने म्हंटले आहे की, ” 1 मे 2017 पासून महारेरामध्ये सुमारे 47,000 एजंट्सची नोंदणी झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, महारेराने (MahaRERA) 13,785 रिअल इस्टेट एजंट्सची नोंदणी त्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण न केल्यामुळे रद्द केली आहे,” असे महारेरा अधिकाऱ्याने सांगितले.

महारेरा चे (MahaRERA) चेअरमन अजोय मेहता म्हणाले, “रिअल इस्टेट क्षेत्रात, ‘एजंट’ महत्वाची भूमिका बजावतात कारण ते घर खरेदीदार आणि विकासक यांच्यातील दुवा असतात. घरखरेदी करणारे सहसा त्यांच्याशी संपर्क साधतात. सहसा, संभाव्य गृहखरेदीदार प्रकल्पाशी संबंधित प्राथमिक माहिती थेट या एजंटांकडून प्राप्त करतात.”रिअल इस्टेट एजंट्सना रिअल इस्टेट (नियमन आणि विकास) कायदा, 2016 च्या नियमनाची माहिती असणे आवश्यक आहे. विकासकाची विश्वासार्हता आणि प्रकल्प, जमिनीच्या टायटलची वैधता, RERA-अनुपालक चटई क्षेत्र, प्रारंभ प्रमाणपत्रे आणि स्थानिक प्राधिकरणांकडून मिळालेल्या मंजुरी यासारख्या प्रकल्प आणि उद्योगाच्या विविध पैलूंबद्दल त्यांना माहिती असणे आवश्यक आहे. त्यांना डिफॉल्ट, विकासकांची आर्थिक स्थिती आणि संबंधित बाबींचे तपशील कसे मिळवायचे हे देखील माहित असले पाहिजे. या सर्व माहितीच्या आधारे, ग्राहक मालमत्ता खरेदी करण्याबाबत माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतात.” मेहता म्हणाले. म्हणून, महारेराने एजंटना प्रशिक्षण घेणे, परीक्षा उत्तीर्ण करणे आणि प्रमाणपत्र घेणे अनिवार्य केले आहे.

अन्यथा विकासकांची नोंदणीही रद्द (MahaRERA)

हा निर्णय 10 जानेवारी 2023 रोजी घेण्यात आला आणि शेवटी 1 जानेवारी 2024 रोजी सर्व एजंट्ससाठी बंधनकारक होण्यापूर्वी अनेक वेळा वाढविण्यात आला. असे असूनही, सुमारे 20,000 एजंट कार्यरत आहेत ते अद्यापही अपात्र आहेत आणि त्यांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. जे विकसक अपात्र एजंट्सशी संलग्न राहतील त्यांची नोंदणी रद्द करण्यास महारेरा मागेपुढे पाहणार नाही. विकासकांनी या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नये, असा इशारा मेहता यांनी दिला.