Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडी याच ‘त्या’ 35 जागांवर सेफ आहे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

महाविकास आघाडीच्या 35 जागा येणार, असा अंदाज अनेकांनी बांधला. पण याला तेव्हा बळ मिळालं जेव्हा शरद पवारांनी यावर वक्तव्य केलं. महाविकास आघाडीच्या किमान 35 जागा येतील या पवारांच्या दाव्याने मग यावर बरी चर्चा झाली. मतदानाचे टप्पे पुढे सरकत गेले तेव्हा तुतारी, मशाल आणि हाताच्या पंजाला मिळणारा रिस्पॉन्स पाहता स्थानिक पत्रकारांपासून ते सर्वसामान्य जनताही आघाडीला 35 जागा तर मिळतीलच, असं आत्मविश्वासाने बोलू लागलेत. पण महाविकास आघाडीला ज्या 35 जागा आरामात जिंकू असं वाटतंय त्या नेमक्या कोणत्या आहेत? त्यातही तुतारी, मशाल आणि पंजा यापैकी कुणाच्या वाट्याला जास्त सेफ जागा आहेत? तेच पाहू

सुरुवात करूयात ठाकरे गटापासून…

ठाकरेंना जी आपली पहिली जागा सेफ वाटतेय ती जागा आहे यवतमाळ वाशिमची…भावना गवळी यांचे तिकीट कापण, मराठा – कुणबी – मुस्लिम मतांची झालेली एकी आणि बाहेरचा उमेदवार असा लागलेला टॅग या सगळ्या गोष्टी ठाकरेंच्या संजय देशमुख यांच्या पथ्यावर पडल्या होत्या. राजश्री पाटील यांचं स्वतःच राजकीय अस्तित्व नसणं यामुळे सुद्धा इथे मशालच जिंकणार, हे जवळपास फिक्स आहे. ठाकरेंना दुसरा सेफ मतदारसंघ वाटतोय तो धाराशिवचा… ठाकरेंशी एकनिष्ठ राहिल्यामुळे ओमराजे निंबाळकरांना याचा आधीपासूनच अडवांटेज होता. त्यातही भाजप ठाकरेंना घाबरलीय म्हणून अर्चना पाटील यांना राष्ट्रवादीत पाठवून घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवायला पाठवलय, असं नरेटीव ठाकरेंनी बिल्डप केल्यामुळे आणि निंबाळकर यांची मतदारसंघातील ताकद पाहता इथे मशाल वन साईड येईल असं चित्र आहे…ठाकरेंचा तिसरा सेफ मतदारसंघ वाटतोय तो बुलढाण्याचा…ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर, शिंदेंकडून प्रतापराव जाधव तर अपक्ष रविकांत तुपकर अशी इथली लढत झाली. शि प्रतापराव जाधव यांच्या विरोधातली अँटीइनकंबनसी गद्दार विरुद्ध खुद्दार अशी प्रचाराची लाईन आणि जरांगे फॅक्टरमुळे शिवसेनेकडे झुकलेली मराठा ताकद हे बुलढाण्यात खेडेकरांच्या पथ्यावर पडलं. त्यामुळे इथे मशाल जोरात आहे.

महाराष्ट्रात महायुतीपेक्षा, Mahavikas Aghadi च पारड जड दिसतंय | Lok Sabha Election, Sharad Pawar

ठाकरेंना सेफ वाटणारा चौथा मतदारसंघ हा हिंगोलीचा…ठाकरेंच्या नागेश पाटील अष्टीकर यांच्या विरोधात हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र ऐनवेळी त्यांची उमेदवारी मागे घेत कोहळीकरांना उमेदवारी देण्यात आली. कागदावर येथे महायुतीची ताकद जास्त दिसत असली तरी शेती प्रश्न, मराठा आरक्षण, ठाकरेंच्या बाजूने असणारी सहानुभूतीची लाट अष्टीकरांनी प्रचारात लावलेली ताकद आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीचं वातावरण पाहता हिंगोलीत अष्टीकर यांच्या बाजूने सध्या निकाल दिसतोय…ठाकरेंची पाचवी जागा शिर्डीची…इथे सदाशिव लोखंडे विरुद्ध भाऊसाहेब वाकचौरे अशी इंटरेस्टिंग लढत झाली. सदाशिवराव लोखंडे यांच्याविरोधातील अँटी इन्कमबन्सी, शिंदेंना साथ दिल्याने तुटलेला शिवसैनिकांचा कनेक्ट आणि वाकचौरे यांनी जुळवून आणलेली जातीची समीकरण यामुळे शिर्डी हा ठाकरेंसाठी सेफ समजला जातोय…सेफ असणारी ठाकरेंची सहावी जागा म्हणजे छत्रपती संभाजीनगर चंद्रकांत खैरे यांना महाविकास आघाडीची मिळालेली भक्कम साथ, मुस्लिम आणि मराठा मतांचं ठाकरेंच्या बाजूने झालेलं कन्वर्जन, मतदारसंघातील जुना आणि कट्टर शिवसैनिक यामुळे संदीपान भूमरे आणि इम्तियाज जलील यांच्यापेक्षा चंद्रकांत खैरेच निकालात उजवे ठरतील, हे पहिल्यापासूनच बोललं जात होतं.

ठाकरेंचा सातवा मतदारसंघ हा हातकणंगलेचा…हातकणंगलेत झालेल्या चौरंगी लढतीत आपली विद्यमान खासदारकी टिकवण्यासाठी मानेंना बरीच कसरत करावी लागली. भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाचा मानेंना असणारा विरोध आणि आपल्या पहिल्या टर्ममध्ये अनेक स्थानिक नेत्यांशी बिघडलेले संबंध यामुळे माने बॅकफुटला होते.. त्यात जयंत पाटील आणि सतेज पाटील यांनी दिलेला बॅक सपोर्ट तसेच सत्यजित आबा पाटील यांचा मतदारसंघातील कनेक्ट यामुळे मशाल इथून जिंकून येईल असा ठाकरेंनाही विश्वास वाटतोय…ठाकरेंचा आठवा सेफ मतदारसंघ आहे तो नाशिकचा…नाशिकात प्रचाराला सुरुवात झाल्यापासूनच ठाकरेंच्या राजाभाऊ वाजे यांच्या नावाची हवा होती. ग्रामीण भागाला आपलंसं करणार नेतृत्व, साधी राहणीमान यामुळे शिवसैनिकांनी त्यांना उचलून घ्यायचं ठरवलं होतच. त्यात हेमंत गोडसे यांची निष्क्रियता, स्थानिक राजकारणात ढवळाढवळ आणि भुजबळांसारखा नेता नाराज असणं हे सगळंच वाजेंच्या पथ्यावर पडलं. ग्रामीण भागातील वाढलेला मतदानाचा टक्का यामुळे वाजे मशाल आणणार, हे घराघरात बोललं जातंय…ठाकरेंना सेफ वाटणारा नववा मतदारसंघ परभणीचा…महायुतीकडून जानकरांच्या विरोधात ठाकरेंच्या बंडू उर्फ संजय जाधवांनी दंड थोपटले होते. शिवसेनेच्या शिंदे गटाचा प्रभाव परभणीत जास्त दिसला नाही. ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलेल्या परभणीचा निकाल हा नेहमीच शिवसेनेच्या बाजूने राहिला. त्यामुळे जेव्हा जानकरांच्या विरोधात लढत झाली तेव्हा इथे बंडू जाधव सहज निवडून येतील, असं चित्र आहे…

ठाकरेंचा दहावा मतदारसंघ मावळचा…मावळात अजित पवार गटाच्या आमदाराने आपला म्हणावा असा प्रचार केला नाही, अशी खंत स्वतः बारणेंनीही व्यक्त केली. वाघेरे हे तसे मूळचे अजितदादांचे कार्यकर्ते असल्याने इथल्या राष्ट्रवादीच्या केडरचा सपोर्ट हा ठाकरे गटाच्या बाजूने लागल्याचं बोललं जातं. थोडक्यात संजोग वाघेरे मावळाच्या राजकारणात ठाकरेंसाठी प्लसमध्ये राहिले…ठाकरेंची अकरावी सेफ जागा ही रत्नागिरी सिंधुदुर्गची…विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे अशी इथं काटे की टक्कर होती. राणेंच्या मदतीला राज ठाकरे धावून आले. केसरकर, सामंत, तेली या सगळ्यांनी राणेंसाठी खिंड लढवली. पण इथे शिवसेना शिंदे गटाची नाराजी, त्यात राणेंच्या उमेदवारीनं काठावरचा शिवसैनिक ठाकरे गटाकडे झुकल्याने इथं विनायक राऊत यांचं पारडं जड आहे, असं सगळेजण बोलू लागलेत…ठाकरेंची बारावी सेफ जागा ठाण्याची ..राजन विचारे विरुद्ध नरेश म्हस्के यांच्या लढतीत राजन विचारे वन साईड मैदान मारतील, असं वातावरण प्रचाराच्या पहिल्या दिवसापासूनच ठाण्यात होतं. नरेश म्हस्के यांना प्रचाराला मिळालेला अगदी थोडा थोडका वेळ, ठाकरेंच्या बाजूने असणारी सहानुभूतीची लाट आणि नरेश म्हस्के यांची उमेदवारी कनेक्ट न होण…या सगळ्या गोष्टी ठाकरेंच्या पथ्यावर पडताना दिसल्या…ठाण्यातून शिंदेंचा उमेदवार पडणं ही मात्र ठाकरेंसाठी मोठी नाचक्की असू शकते ..

ठाकरेंची तेरावी सेफ जागा मुंबई उत्तर पश्चिमची…वायकर हे ठाकरेंचे एकनिष्ठ…मात्र इडीने चक्र फिरवल्याने त्यांना नाईलाजाने शिंदेंसोबत जावं लागलं… पक्षप्रवेश होताना त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बरंच काही सांगत होते… त्यामुळे शिंदेंचा फोर्स असला तरी मशालीच्या विरोधात वायकर किती ताकद लावून लढतील, हा मोठा प्रश्नच होता. हे सगळं गणित पाहता अमोल कीर्तीकर इथून मशाल पेटवणार हे फिक्स होतं. ठाकरेंची चौदावी सेफ जागा ही दक्षिण मुंबईची…राहुल नार्वेकर, मंगलप्रसाद लोढा या भाजप नेत्यांनी यामिनी जाधव निवडून याव्यात, यासाठी बराच जोर लावला. पण मराठी विरुद्ध अमराठी, अरविंद सावंत यांनी केलेला आक्रमक प्रचार, इडीच्या कारवाईने यामिनी जाधव यांनी केलेली बंडखोरी, असं बिल्डप केलेल नरेटिव्ह आणि सहानुभूतीची लाट यामुळे अरविंद सावंत यांच्यासाठी इथून विजय सोप्पा समजला जातोय…

ठाकरे यांचा पंधरावी सेफ मतदारसंघ हा मुंबई दक्षिण मध्यचा…दोन टर्म खासदार राहिलेल्या राहुल शेवाळे यांना निवडून आणण्यासाठी शिंदेंनी आपली सारी यंत्रणा कामाला लावली होती. मात्र अनिल देसाईंच्या रूपाने ठाकरेंनी दिलेला कडवा प्रतिस्पर्धी इथं महत्त्वाचा फॅक्टर राहिला. शेवाळेंच्या विरोधातील अँटी इन्कमबन्सी आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांचं मोठ केडर असल्याने इथे देसाई मशाल पेत्वतील, असा ठाकरेंना विश्वास आहे…ठाकरेंसाठी सेफ असणारा सोळावा मतदारसंघ येतो जळगावचा…भाजपच्या स्मिता वाघ आणि ठाकरे गटाचे करण पवार यांच्यातील ही लढत. भाजपच्या बाजूने असणाऱ्या जळगावचं वातावरण उन्मेष पाटलांच्या खेळीमुळे ठाकरेंच्या बाजूने फिरले… थेट सांगणं अवघड असलं तरी ठाकरेंची शिवसेना जळगावात मतदानानंतर सेफ झालीय, असं सगळेच जळगावकर सांगतायत…तर या होत्या ठाकरेंच्या 21 पैकी सोळा जागा जिथे ठाकरेंना आपण सहजपणे निवडून येऊ असा विश्वास वाटतोय…

आता वळूयात काँग्रेसकडे…

काँग्रेसला सेफ वाटणारा पहिला मतदारसंघ हा सोलापूरचा…राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे अशी इथली प्रमुख लढत झाली. अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघात गेली दोन टर्म भाजपचा दबदबा असला तरी यंदा वार फिरलं होतं. दलित, मुस्लिम मतं आणि मोहितेंमुळे मराठा मतं शिंदेंच्या बाजूने झुकल्याने सोलापुरात यंदा काँग्रेसला अप्पर हँड होता. त्यात सातपुतेंच्या प्रखर हिंदुत्वाचा मोठा इम्पॅक्ट सोलापुरात पाहायला मिळालं नाही. त्यामुळे सोलापुरात पंजा जिंकतोय, असं चित्र आहे.काँग्रेससाठी यंदा सर्वात सेफ झालेला दुसरा मतदारसंघ होता कोल्हापूरचा. काँग्रेसनं शाहू छत्रपतींना उमेदवारी दिल्यापासूनच शिवसेनेचे संजय मंडलिक बॅकफुटला गेले होते. धनंजय महाडिक, हसन मुश्रीफ यांनी मंडलिकांच्या पाठीशी आपली सारी ताकद लावली असली तरी बंटी पाटलांच्या यंत्रणेपुढे तिचा निभाव लागताना दिसला नाही. मान आणि मत दोन्ही गादीलाच… या स्टॅन्डमुळे कोल्हापुरातही यंदा पंजा येतोय, हे क्लिअर आहे.काँग्रेसला सेफ वाटणारी तिसरी जागा नंदुरबारची…हिना गावित विरुद्ध काँग्रेसकडून गोवाल पाडवी अशी इथली लढत अटीतटीची झाली. एसटी प्रवर्गासाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघात हिना गावित यांच्या विरोधात वातावरण होतं. त्यात काँग्रेसने अनेक सभांचा धडाका लावत फिरवलेलं वातावरण आणि महायुती मध्ये असणारा समन्वयाचा अभाव यामुळे नंदुरबारमध्ये यंदा काँग्रेसच्या बाजूने वारं आहे.

काँग्रेसचे चौथी सेफ जागा ही लातूरचा…सुधाकर शृंगारे विरुद्ध शिवाजी काळगे यांच्यात झालेल्या या लढतीत काँग्रेसने काळगेंसाठी मोठी ताकद लावली होती. देशमुख कुटुंबानं आपली सारी यंत्रणा प्रचारात उतरवल्याने आणि शृंगारे यांच्या विरोधातील जनतेची नाराजी पिकअप करण्यात काळगेंना यश येताना दिसलं. त्यामुळे सध्याच्या राजकारणात भाजपचा गड असणारा लातूर हा काँग्रेसला निकालात सेफ वाटतोय…काँग्रेसला सेफ वाटणारी पाचवी सेफ म्हणजे अकोल्याचा…भाजपकडून अनुप धोत्रे, काँग्रेसकडून अभय पाटील तर वंचितकडून स्वतः प्रकाश आंबेडकर इथून मैदानात होते. संजय धोत्रे यांच्या खासदारकीच्या कारकिर्दीला कंटाळलेले लोक, दलित आणि मुस्लिम समाजाचं काँग्रेसच्या बाजूने असणं आणि काँग्रेसने लावलेली ताकद यामुळे अकोला काँग्रेसला खात्रीशीर वाटतोय…सहावा मतदारसंघ आहे अमरावतीचा…काँग्रेसकडून बळवंत वानखेडे विरुद्ध भाजपकडून नवनीत राणा अशी ही इंटरेस्टिंग लढत पाहायला मिळाली. प्रहारच्या दिनेश बुब यांनी या लढतीला आणखीनच कडवं बनवलं. प्रचाराच्या सुरुवातीपासूनच वातावरण काँग्रेसच्या बाजूने होतं. त्यात वंचित, आनंदराज आंबेडकर यांच्या एक्झिटमुळे मत विभाजनाचा भाजपला बसू शकणारा संभाव्य फटका टळला. एकूणच हाताचा पंजा इथून लीड घेईल असं मतदान सांगतंय.

काँग्रेससाठीचा सेफ सातवा मतदारसंघ आहे रामटेकचा…शिंदेंनी राजू पारवे यांच्या उमेदवारीची काँग्रेस मधून आयातवारी केल्यानं ही गोष्ट मतदारांना फारशी रुचली नाही. महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी बर्वेंना दिलेली साथ आणि ठाकरे पवारांच्या सहानुभूतीच्या लाटेचा बर्वेंना फायदा होताना दिसला. काँग्रेसची दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक विकासाचं नरेटीव रामटेकमध्येही काँग्रेसला 4 तारखेला लीडमध्ये ठेवेल, असं इथलं चित्र आहे.आठवा मतदारसंघ आहे भंडारा – गोंदियाचा…इथले भाजपचे स्टॅंडिंग खासदार सुनील मेंढे असले तरी काँग्रेसचा या मतदारसंघातील केडर बराच स्ट्रॉंग आहे. सुनील मेंढे यांच्या विरोधात अँटी इन्कमबन्सी आणि काँग्रेसने लावलेली ताकद पाहता प्रशांत पडोळे जिंकतील, असं बोललं जातंय…काँग्रेससाठीची नववी सेफ जागा आहे. गडचिरोली – चिमूरचा…भाजपचे अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे संजय किरसान यांच्यातील ही लढत. अनुसूचित जमातीसाठी राखीव असणारा हा मतदारसंघ भाजपासाठी वन साईड होता. मात्र आदिवासी, दलित आणि अल्पसंख्यांकांच्या मुद्द्यांना हात घालत प्रचारात काँग्रेसने आघाडी घेतली होती.

विदर्भातील सर्वात सेफ दहावी जागा आहे चंद्रपूरची…मतदारसंघात रुजलेला काँग्रेसी विचार, मोदींचा गायब झालेला करिष्मा हे सगळं चंद्रपुरात काँग्रेसच्या पथ्यावर पडणार होतं. त्यात मुनगंटीवारांकडून करण्याआलेल्या विखारी प्रचार त्यांच्यावरच बूमरँग झाल्याने चंद्रपुरात प्रतिभा धानोरकर प्रचाराच्या पहिल्या दिवसापासूनच ते प्रत्यक्ष मतदानापर्यंत लिडमध्ये दिसल्या. त्यामुळे चंद्रपुरात प्रतिभा धानोरकर निकालात लीड घेतील हे फिक्स आहे…अकरावा मतदारसंघ आहे उत्तर मध्य मुंबईचा…भाजपकडून उज्वल निकम विरुद्ध काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांच्यात झालेली ही लढत. अगदी शेवटच्या क्षणी जाहीर झालेल्या या उमेदवारीमुळे दोघांनाही प्रचाराला अगदी थोडासा वेळ मिळाला. मात्र इथला मुस्लिम बहुल भाग आणि शिवसेनेची ताकद गायकवाड यांच्या बाजूने असल्याने उत्तर मध्य मधून वर्षा गायकवाड यांचा विजय फिक्स समजला जातोय…तर अशाप्रकारे काँग्रेस लढवत असणाऱ्या 17 जागांपैकी या 11 मतदार संघात आपण आरामात निवडून येऊ असा काँग्रेसला विश्वास वाटतोय…

आता वळूयात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे…

शरद पवारांना आपल्या पक्षाकडून लढवल्या जाणाऱ्या दहा जागांपैकी नेमक्या कुठल्या आठ जागा सेफ वाटतायेत. ते एकदा पाहुयात…. शरद पवारांना पहिला सेफ मतदारसंघ वाटतोय तो बारामतीचा…सुप्रियाताईंची पॉलिटिकल व्हॅल्यू, शरद पवारांच्या बाजूने असणारं सहानुभूतीचं वारं आणि अजितदादांच्या विरोधात गेलेली स्थानिक समीकरणे यामुळे ताई तुतारी वाजवणार हे फिक्स होतं… अजितदादांनी आव्हान उभं केलं असलं तरी रामकृष्ण हरी वाजवा तुतारी… यामुळे बारामतीत तुतारीचा आवाज घुमणार, असं सगळेजण सांगू लागलेत…दुसरा सेफ मतदारसंघ आहे तो साताऱ्याचा…प्रचारापासून ते प्रत्यक्ष मतदानापर्यंत शशिकांत शिंदे नावाची सातारा मतदारसंघात चर्चा होती… उदयनराजेंचा मतदारांशी तुटलेला कनेक्ट, शरद पवारांच्या बाजूने असणार सहानुभूतीच वार आणि शशिकांत शिंदेंचा जनसंपर्क यामुळे साताऱ्यात यंदाही तुतारी फिक्स समजली जातेय…तिसरा सेफ मतदारसंघ आहे तो माढ्याचा…. मोहिते पाटलांनी उडवून दिलेला प्रचाराचा धुराळा आणि शरद पवारांनी घेतलेल्या एकामागून एक सभा यामुळे मोहिते पाटील इथल्या लढतीत प्लसमध्ये राहिले… उत्तमराव जानकर, सुशील कुमार शिंदे यांना सोबत घेत मोहिते पाटलांनी इथलं जातीय समीकरण आपल्या बाजूने वळत करून घेतलं… त्यामुळे माढ्यात तुत्तारी फिक्स असं सगळेच सांगतायत…

पवारांना सेफ वाटणारा चौथा मतदारसंघ आहे तो शिरूरचा… दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते पाटील आणि स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हणाव असं आढळरावांचं काम केलं नाही अशी चर्चा झाली… शेवटच्या दिवसात अमोल कोल्हे यांनी केलेला वादळी प्रचार आणि त्याला शरद पवारांची मिळालेली जोड यामुळे कोल्हेंच्या तुतारीच पारड शिरूरमध्ये जड आहे.तुतारीसाठीचा पाचवा मतदारसंघ आहे तो दक्षिण नगरचा…निलेश लंके विरुद्ध सुजय विखे पाटील अशी काट्याने काटा काढावा अशी झालेली रंगतदार लढत… पैसे वाटण्यापासून ते बोगस मतदानापर्यंत अनेक घटना नगरमध्ये घडल्या… विखेंना पक्षांतर्गतच सहन करावा लागलेला नाराजीचा फटका, लंकेंवर केलेलं पण विखेंवर बूमरँग झालेलं अजितदादांचं स्टेटमेंट या सगळ्यामुळे लंके नगरमध्ये तुतारी वाजवतील, याची खात्री अनेकांना वाटतेय…पवारांना सेफ वाटणारा सहावा मतदारसंघ आहे तो बीडचा…अत्यंत हायव्होल्टेज ठरलेल्या या मतदारसंघात पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग बप्पा सोनवणे यांच्यात घासून लढत झाली… मराठा विरुद्ध ओबीसी अशा जातीय ध्रुवीकरणातून झालेल्या या निवडणुकीत बजरंग बाप्पा यांचं पारड शेवटपर्यंत जड दिसलं… त्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासाठी बालेकिल्ल्यात तुतारी वाजणं ही धोक्याची घंटा ठरू शकते…

पवारांसाठीचा सातवा सेफ मतदारसंघ आहे तो भिवंडीचा…कपिल पाटलांच्या विरोधात असणारी अँटीइन्कमबन्सी, दोन टर्म निवडून देऊनही तसाच जिवंत असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे जनतेला बदल हवा होता… हेच जनमानस ओळखून पवारांनी इथून बाळ्यामामा यांना मैदानात उतरवलं… मनी आणि मसल पॉवर, सर्वपक्षीय नेत्यांशी असणारे जिव्हाळ्याचे संबंध आणि शरद पवारांच्या बाजूने असणार वारं याचा अचूक अंदाज घेतला, तर बाळ्यामामा भिवंडी गाजवणार, असं इथलं वातावरण आहे…पवारांसाठीचा आठवा आणि शेवटचा सेफ मतदारसंघ म्हणजे दिंडोरीचा…भाजपच्या भारती पवार विरुद्ध राष्ट्रवादीकडून भास्कर भगरे अशी इथली लढत झाली. दिंडोरीत मतदान लोकांनी हाती घेतलं होतं. भाजपच्या सत्तेला जनता कंटाळली होती. भगरेंनी केलेला वादळी प्रचार आणि तुतारीच्या बाजूने असणारी सौम्य लाट इथेही भास्कर भगरे यांना विजय मिळवून देईल, असं वातावरण आहे…तर अशा होत्या महाविकास आघाडीला सेफ वाटणाऱ्या या 35 जागा…याची फोड करून पाहिली तर ठाकरेंच्या 21 पैकी 16, काँग्रेसच्या 17 पैकी 11 तर शरद पवारांच्या दहा पैकी तब्बल आठ जागा या सेफमध्ये असल्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघापैकी खरंच महाविकास आघाडी 35 जागा जिंकेल असं तुम्हालाही वाटतं का? तुमचा अंदाज काय सांगतोय? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.