महायुतीत जागा वाटपाचा तिढा सुटला!! भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादी लढणार इतक्या जागा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सोमवारी झालेल्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये (Central Election Committee Meeting) महाराष्ट्रातील जागा वाटपाच्या मुद्द्यावरून सखोल चर्चा करण्यात आली आहे. या बैठकीमध्येच महाराष्ट्रातील मतदार संघात महायुतीचे कोण कोण उमेदवार निवडून येऊ शकतात, याचा सविस्तरपणे आढावा घेण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर, भाजप (BJP), शिवसेना(Shivsena) आणि राष्ट्रवादी(NCP) यांना कोणते मतदारसंघ सोडायचे आणि या मतदारसंघासाठी कोणते उमेदवार उभे करायचे हे देखील ठरवण्यात आले आहे. मुख्य म्हणजे, या बैठकीतच भाजप लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) 31 जागांवर लढणार हे निश्चित करण्यात आले आहे.

कोणता पक्ष कोणत्या जागांवर लढणार?

नुकत्याच वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये जागावाटपासंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये भाजप 31 लोकसभा मतदारसंघामध्ये आपले उमेदवार उभे करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यासह शिवसेना 13 लोकसभा मतदारसंघात आपल्या उमेदवारांची नावे घोषित करेल. तर राष्ट्रवादी काँग्रेस 4 लोकसभा मतदारसंघाच्या जागांसाठी निवडणूक लढवेल. हे देखील ठरवण्यात आले आहे.

सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या उमेदवारांची आणि लढवू इच्छिणाऱ्या मतदारसंघाची यादी मांडली होती. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या हा मान ठेवत त्यांना 13 लोकसभा मतदारसंघातील जागा देण्याचा शब्द दिला. या बैठकीत मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघ भाजपने घेतला आहे. तर ठाणे मतदार संघ शिवसेनेला दिला आहे. याबरोबर, कोल्हापूर मंतदारसंघात समरजीत घाटगे हे निवडणूक लढवणार आहेत. या सर्व महत्त्वाच्या बाबी सोमवारच्या बैठकीत ठरवण्यात आल्या आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी पक्षाला म्हणजेच अजित पवार यांच्या गटाला राज्यातील चार लोकसभा मतदारसंघ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बारामती, शिरूर, रायगड आणि परभणी हे चारही मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणार आहेत. ही सर्व चर्चा सोमवारी झालेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुढील दोन दिवसांमध्ये पक्षांचे जागावाटप जाहीर करण्यात येईल.