हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या रायगड (Raigad) जिल्ह्यातील पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेनेमध्ये मोठी रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादीच्या खासदार आदिती तटकरे (Aditi Tatkare) आणि शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले (Bharat Gogavale) हे दोघेही या पदासाठी आग्रही आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी पालकमंत्री सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तटकरे यांच्यावर टीका करत थोरवे यांनी त्यांना औरंगजेब असे संबोधले आहे.
अलिबाग येथे आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalavi) यांनी आयोजित केलेल्या ‘आमदार चषक’ क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली. यावेळी त्यांनी, “सुनील तटकरे हे औरंगजेब आहेत. त्यांचे वास्तव्य सुतारवाडीत आहे. आमच्या आमदारांमुळे ते खासदार झाले आहेत. मात्र, येत्या लोकसभा निवडणुकीत आम्हीच लढणार आहोत. आता त्यांना ग्रामपंचायतीचं सदस्यत्वही मिळू द्यायचं नाही,” असा थेट इशारा दिला.
पुढे बोलताना महेंद्र थोरवे यांनी क्रिकेटचासंदर्भ देत तटकरे कुटुंबावर देखील निशाणा साधला. थोरवे म्हणाले की, “क्रिकेटमध्ये पंचांचा निर्णय अंतिम असतो, पण आता थर्ड अंपायरही आहे. कॅप्टन कूल असला तरी स्पर्धा जिंकता येते. पण जर कॅप्टनने फक्त आपल्या कुटुंबातील खेळाडूंनाच संघात घेतलं, तर तो संघ जिंकू शकत नाही. रायगड जिल्ह्यातही हेच लागू आहे. आता सगळं काही एका कुटुंबानेच हडपण्याचा प्रयत्न केला, तर ते आम्ही सहन करणार नाही,”
महत्वाचे म्हणजे, यावेळी उपस्थित असलेले शिवसेनेचे आमदार आणि मंत्री भरत गोगावले यांनीही महेंद्र थोरवे यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला. “रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी मी सक्षम आहे आणि मला स्थानिक आमदारांचा पाठिंबा आहे,” असे गोगावले यांनी सांगितले. यानंतर क्रिकेटस्पर्धेत आमदार महेंद्र दळवी यांनी बॅटिंगसाठी मैदानात उतरत उपस्थितांचे मनोरंजन केले. तर महेंद्र थोरवे यांनी गोलंदाजी केली. या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री भरत गोगावले आणि अन्य मान्यवर ही उपस्थित होते.