राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाला जाग; माहीमच्या ‘त्या’ मजारीवर अखेर हातोडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माहीमच्या खाडीत अनधिकृत मजार बांधल्याचा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केला होता तसेच या अतिक्रमणावर कारवाई केली नाही तर त्याच ठिकाणी गणपतीचे मोठं मंदिर बांधू असा इशाराही प्रशासनाला दिला होता. राज ठाकरेंच्या या इशाऱ्यानंतर प्रशासनाला जाग आली असून आज सकासकाळीच अधिकाऱ्यानी हे अतिक्रमण हटवले आहे. तसेच य अनधिकृत मजारवर जेसीबी फिरवण्यात आली आहे.

राज ठाकरे यांच्या इशाऱ्यांनंतर काल रात्रीच प्रशासन ऍक्शन मोडमध्ये आलं. काल रात्रीच पोलिसांनी संबंधित मजारवर जाऊन पाहणी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी रात्रीच हे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी प्रशासन, पोलीस, आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन हे अनधिकृत बांधकाम हटवलं आहे. अवघ्या अर्ध्या तासात ही संयुक्त कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते ?

माहीमच्या मगदूनबाबाच्या समोर, अनधिकृत मजार बांधली जात आहे असं म्हणत राज ठाकरे यांनी भरसभेत व्हिडिओ सुद्धा दाखवला होता. माहिम पोलीस स्टेशन जवळ आहे. लक्ष नाही. महापालिकाचे लोकं उभे असतात. पण पाहिलं नाही. दिवसाढवळ्या तुमच्या डोळ्यांसमोर नवीन हाजीअली तयार करणार का ? असा सवालही राज ठाकरेंनी केला. तसेच प्रशासनाने जर महिन्याभरात यावर कारवाई केली नाही तर त्याच्या बाजूला सगळ्यात मोठं गणपतीचं मंदिर उभं केल्या शिवाय राहणार नाही. मग काय व्हायचं ते होऊन जाऊ दे असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता.