हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) दोन दिवसीय दौऱ्यासाठी पुण्यात दाखल झाले आहेत. काल सायंकाळी पुणे शहरात पोहोचल्यानंतर केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. आजपासून अमित शहा यांचा हा दौरा सुरू होत आहे. त्यांचा हा दौरा राजकीय घडामोडींसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. त्यांच्या या दौऱ्यानिमित्त पुण्यात खास सुविधा आणि सोय करण्यात आली आहे.
अमित शाह यांचा पुणे दौरा
गृहमंत्री अमित शाह यांचा मुक्काम कोरेगाव पार्क येथील वेस्टिन हॉटेलमध्ये असणार आहे. उद्या (रविवार) सकाळी ११ वाजता ते पश्चिम गृह विभागाच्या बैठकीत सहभागी होतील. तसेच, दुपारी तीन वाजता हडपसरमधील विठ्ठल तुपे सभागृहात जनता सहकारी बँकेच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या समारोप कार्यक्रमात सहकारमंत्री म्हणून उपस्थित राहतील.
यानंतर, बालेवाडी येथे आयोजित एका महत्त्वाच्या कार्यक्रमात अमित शाह यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील २० लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीपत्रांचे वाटप केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर, हॉटेल वेस्टिन आणि बालेवाडी परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पुण्यात वाहतूक बदल आणि निर्बंध
अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे पुणे वाहतूक पोलिसांनी शहरातील काही प्रमुख मार्गांवर बदल केले आहेत. तसेच, काही मार्गांवर जड आणि अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे.
महत्त्वाचे वाहतूक बदल
- विद्यापीठ चौक ते बाणेर रोड – राधा चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी गणराज चौकातून डावीकडे वळावे आणि किया शोरूम अंडरपास किंवा ननावरे अंडरपास मार्गे जावे.
- मुंबई-बंगळुरू बायपासवरून बाणेर रोडकडे जाणारी वाहने – बालेवाडी जकात नाक्यावरून डावीकडे वळून हायस्ट्रिट मार्गे गणराज चौकातून पुढे जावे.
- हिंजवडी, वाकड, लोणावळा, मुंबईकडे जाणारी वाहने – पुणे विद्यापीठ चौकातून बाणेर रोडने न जाता पाषाण रोडमार्गे चांदणी चौक किंवा औंध रोडमार्गे जावे.
जड आणि अवजड वाहनांवर शनिवार (२२ फेब्रुवारी) मध्यरात्री १२ ते रविवार (२३ फेब्रुवारी) मध्यरात्री १२ वाजेपर्यंत बंदी राहणार आहे. तसेच, मिक्सर, डंपर, हायवा, जेसीबी आणि रोड रोलर यांना सर्व रस्त्यांवर प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे.
पुणे विद्यापीठ चौक ते चांदणी चौक (पाषाण रोड)
पुणे विद्यापीठ चौक ते राधा चौक (बाणेर रोड)
पुणे विद्यापीठ चौक ते राजीव गांधी पूल (औंध रोड)
दरम्यान, अमित शाह यांच्या दौऱ्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे, नागरिकांनी वेळेपूर्वी नियोजन करून आवश्यक मार्गांचा वापर करावा. तसेच, ट्रॅफिक पोलिसांनी दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा.