शहरातील फुटपाथ अतिक्रमणमुक्त करा, अन्यथा रस्त्यावर उतरू : नवाज सुतार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
कराड शहरातील फुटपाथवर टपऱ्या, दुकाने, फेरीवाले नेहमीच असतात. त्याशिवाय अवैध झोपड्या, गर्दुल्ल्यांची आश्रयस्थाने, होर्डिंग्ज, हातगाड्या आहेत. फुटपाथवर सध्या अतिक्रमण झालेले आहे. पालिकेत नव्याने येणारे मुख्याधिकारी नव्या संकल्पना घेऊन येतात. मात्र अंमलबजावणीच्या नावाने बोंबच असते. तेव्हा शहरातील फुटपाथ अतिक्रमणमुक्त करा, अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा राष्ट्रवादी युवक महाराष्ट्र प्रदेश सदस्य नवाज सुतार यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन कराड पालिकेला दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, पादचाऱ्यांचा रस्त्यांवर अग्रहक्क असतो, असं म्हणतात. पण हल्ली रस्ते पादचाऱ्यांसाठी राहिले नाहीतच. पण त्यांच्या हक्काचे फूटपाथही त्यांचे राहिलेले नाही. कराड शहरात तर सर्व महत्त्वाच्या रस्त्यांवरील फूटपाथवर अतिक्रमण झाले आहे. पालिका, लोकप्रतिनिधी, नागरिक, फेरीवाले, पोलिस या सगळ्यांच्याच एकत्रित सहभागातून फूटपाथमुक्त होऊ शकतात आणि चालणाऱ्यांना हक्काची वाट मिळू शकते. आज या कराड शहारातील एक रस्ता किंवा फुटपाथ अतिक्रमणमुक्त आहे का? असे नगरपालिका छातीठोकपणे सांगू शकते काय?

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब व आदरणीय पी. डी. पाटील साहेब यांची कर्मभूमी असलेल्या कराड शहराला विद्येचे माहेरघर म्हणून एक नवी ओळख आहे. परंतु शहरातील एकही फुटपाथ पादचाऱ्यांना चालण्यासाठी उपयोगात येताना दिसत नाही. शहरातील फूटपाथची अवस्था ही अतिशय विदारक आहे. सलग फूटपाथवरून कराडकर चालू शकत नाहीत. या फूटपाथवरील अतिक्रमणांमुळे चालताना रस्त्यांवर उतरावे लागते, मध्येच वाहतुकीची कोंडी होते. तेव्हा हे फूटपाथ मोकळे केव्हा होणार, हेच उत्तर आज सर्वसामान्य कराडकर मागत आहे.