गोहत्या आणि गोतस्करी करणाऱ्यांवर “मकोका” कारवाई केली जाईल; फडणवीसांचा थेट इशारा

fadanvis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यामध्ये दिवसेंदिवस गोहत्या (Cow slaughter) आणि गोतस्करीचे (Cow smuggling) प्रमाण वाढत चालले आहे. या गुन्ह्यांना आळा बसण्यासाठी राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांवर संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार (मकोका) कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिला.

विधानसभेत श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार संग्राम जगताप यांनी या विषयावर लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यांनी गोतस्करीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास आणून दिले आणि अशा गुन्ह्यांना थांबवण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर देताना सांगितले की, वारंवार अशा गुन्ह्यांची पुनरावृत्ती होत असल्याने आता संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे..

महत्वाचे म्हणजे, यापूर्वी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करून आरोपीला अटक केल्याचे सांगितले. मात्र, न्यायालयाने त्याला जामिनावर सोडले. यामुळेच अशा गुन्ह्यांना कठोर शिक्षा मिळावी, यासाठी मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय घेतला जात असल्याचे सभागृहात स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, राज्य सरकारने विविध सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांकडे असलेल्या कर थकबाकीच्या वसुलीसाठी मोठा निर्णय घेतला आहे. जवळपास २५ हजार कोटी रुपयांची थकबाकी असल्याने सरकारने या वसुलीसाठी ‘अभय योजना’ जाहीर केली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात यासंदर्भात घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकृतपणे या योजनेची घोषणा केली आहे.

या योजनेअंतर्गत सरकारने कर थकबाकीदारांना काही विशेष सवलती देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी आपल्या थकबाकीची तत्काळ भरपाई करावी, असे आवाहन सरकारने केले आहे. या योजनेमुळे सरकारी तिजोरीत मोठ्या प्रमाणात महसूल जमा होण्याची शक्यता आहे. ज्याचा उपयोग विकासकामांसाठी करता येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.