हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । हिरे कुटुंबीयांचा एकहाती दबदबा राहिलेल्या मालेगाव बाह्य या मतदारसंघात 2004 ला दादा भुसे यांची एन्ट्री झाली.. आणि तेव्हापासून चांगल्या अर्थाने या मतदारसंघावर भुसेंचीच दादागिरी चालू लागली… भुसे यांनी विकासकामं केली… जनतेचा विश्वास संपादित तर केलाच पण सोबतच शिवसेनेला मतदारसंघातल्या गावाखेड्यात नेऊन पोहचवलं… याच प्रेमापोटी सलग आमदारकीचा चौकार मारणारे भुसे शिवसेनेच्या फुटीनंतर पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात दिसतील… त्यामुळे किमान मालेगावात तरी शिवसेना म्हणजे भुसे आणि भुसे म्हणजेच शिवसेना असंच समीकरण असल्याने खरंच गद्दरीचा बसलेला शिक्का त्यांना विधानसभेला पराभवाचा उंबरठ्यावर घेऊन जाईल का? दादा भुसे यांना काटशाह देण्यासाठी ठाकरे गटाकडून कोणत्या मोहऱ्याला समोर केलं जाऊ शकतं? मालेगाव मध्ये सलग पाचव्यांदाही भुसेंचीच दादागिरी चालेल… की नवा भिडू आमदार होईल? त्यांचंच हे विश्लेषण…
दाभाडी मतदार संघ आता मालेगाव बाह्य मतदारसंघ म्हणून ओळखला जातो… भाऊसाहेब हिरे यांचा मतदार संघ अशीदेखील त्याची ओळख… स्वातंत्र्यानंतर हा मतदार संघ कॉग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला. भाऊसाहेब हिरे, डॉ.बळीराम हिरे, पुष्पाताई हिरे आणि अलीकडे 2004 पर्यंत या मतदार संघात हिरे घराण्याचे वर्चस्व होते. पुष्पाताई नंतर प्रशांत हिरे यांनी एकदा शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी असा प्रवास करत मंत्रीपद मिळवले. 2004 साली दाभाडी मतदार संघात दादा भुसे यांचा प्रवेश झाला… आणि नवीन राजकीय समीकरणांचा मतदारसंघात जन्म झाला…
शिवसेना-भाजपाच्या नेत्यांनी पक्षाच्या उमेदवारांविरोधात बंड करत दादा भुसेंमागे शक्ती उभी केली. भुसे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत प्रशांत हिरे यांचा पराभव केला. येथूनच हिरे घराण्याच्या राजकीय अस्तित्वाला उतरती कळा लागली…. वर्षानुवर्षे एकाच घराण्याला पाढिंबा देणाऱ्या दाभाडीच्या मतदारांनी बदल घडवत प्रथमच हिरे घरण्याला बाजूला सारले आणि दादा भुसेंच्या रुपाने नवीन चेहरा मतदारांनी स्वीकारला… 2009 ला मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर दाभाडीचा मालेगाव बाह्य मतदारसंघ झाला… तेव्हाच्या निवडणुकीत अधिकृतपणे सेनेच्या तिकिटावर उमेदवारी मिळवत पुन्हा एकदा भुसे यांनी प्रशांत हिरे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला…
मतदार संघात केलेली विकासकामे आणि प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणे यामुळे दिवसेंदिवस त्यांच्या लोकप्रियतेत वाढ होत गेली. त्याचा फायदा त्यांना 2004, 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत झाला. सलग तीन वेळा निवडून आल्यावर भुसे यांनी विकासावर अधिक भर दिला. शिवाय युवाशक्ती त्यांच्या मागे उभी ठाकली, गावा गावात त्यांनी सेनेचा प्रभाव वाढविला. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांच्या मागे उभे ठाकत ग्रामपंचायती, पंचायत समिती, बाजार समिती ताब्यात घेत आपले वर्चस्व सिद्ध केले. विरोधक कमी करत गेले. याचाच फायदा त्यांना 2019 च्या निवडणूकीत झाला आणि सलग चौथ्यांदा ते आमदार म्हणून निवडून आले… काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांना तब्बल 48 हजारांनी पराभवाचा दणका देत भुसेंनी आमदारकीचा चौकार मारला.. खरंतर दादा भुसे हे शिवसेनेचे असले तरी कायम विकासाभिमुख राजकारणावर भर दिल्यानेै शिवसेनेच्या फुटीनंतरही त्यांनी विकासाला कधीही दुजाभाव न झाल्याने बंडाळीचा फारसे पडसाद मालेगाव बाह्यमध्ये उमटताना दिसले नाहीत.
पण मालेगाव बाह्यच राजकारण आतून बाहेरून ढवळून निघालं… भुसे बंडाळीत सहभागी झाल्याने ठाकरेंनी भुसेंचे पारंपारिक प्रतिस्पर्धी अद्वेय हिरे यांच्या हाती शिवबंधन बांधत मालेगाव बाह्य मधील दादा भुसेंच्या विरोधात यॉर्कर टाकला… पण अगदी फिल्मी स्टाईल प्रमाणे हिरेंनी मशाल हाती घेताच त्यांच्या पाठीशी चौकशीचा ससेमिरा लागला… त्यांना अटकही झाली… त्यामुळे ठाकरे गट पुन्हा बॅकफुटला गेला.. भुसेंना हायस वाटणार तोच आणखीन एक नवा बॉम्ब भुसेंवर येऊन आदळला… तो म्हणजे भुसेंचेच जिवलग मित्र असलेले आणि बारा बलुतेदार संघटनेचे नेते बंडूकाका बच्छाव यांनी दिल्लीत संजय राऊतांची भेट घेत मशाल हाती घेतली…. आणि मालेगाव मधील धक्कातंत्र नाटकाचा एक अंक पूर्ण झाला… खरंतर त्यांना मशालीकडून उमेदवारीचा शब्द मिळाला असला हिरे यांना जामीन मिळाल्यावरच मशालीचा उमेदवार कन्फर्म होईल, असं बोललं जातंय…
बच्छाव इच्छुक असल्याने आता मालेगाव बाह्य मध्ये पहिल्यांदाच शिवसेना विरुद्ध शिवसेना… मशाल विरुद्ध धनुष्यबाण, बच्छाव विरुद्ध भुसे अशी अटीतटीची आणि घासून लढत येणाऱ्या विधानसभेला आपल्याला पाहायला मिळू शकते… त्यामुळे चेहरा बदलला तरी मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहणार आहे.. फक्त कोणत्या चिन्हाच्या याचं उत्तर समजून घेण्यासाठी शेवटच्या दिवसातीलच राजकारण कसं घडतंय? ते पाहावं लागेल… मागच्या वेळेला भुसेंचं राजकीय वर्चस्व मोडीत काढण्यासाठी सगळे विरोधक एकवटले.. त्यांनी काँग्रेस उमेदवाराच्या पाठीशी ताकद लावली… पण भूसेंच्या लोकप्रियतेपुढे सारं काही फिकं पडलं… पण यंदा शिवसेना फुटीचा इमोशनल फॅक्टर आणि हिरे – बच्छाव या जोडगोळीला मिळणारी ठाकरे आणि मविआची साथ पाहता दादा भुसेंचा विजयाचा वारू नक्कीच रोखता येऊ शकतो.. पण भुसेंचं मतदारसंघावरच वर्चस्व पाहता ठाकरे गटाला एक्सटरा ऑर्डनरी काम करावं लागेल एवढं मात्र नक्की…बाकी तुम्हाला काय वाटतं? मालेगाव बाह्यचा 2024 चा आमदार कोण? अद्वैय हिरे, बंडूकाका बच्छाव की पुन्हा दादा भुसे? तुमचा कौल कुणाला? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा..