ना कर ना दरवाढ : मलकापूरचा 59 कोटी 40 लाखाचा अर्थसंकल्प

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी
मलकापूर नगरपरिषदेचा सन 2023-24 सालचा अर्थसंकल्पास विशेष सभेसमोर सादर केला. सदर अर्थसंकल्पामध्ये कोणत्याही प्रकारची दर व कर वाढ न करता सर्व समावेशक बाबींचा समावेश व सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प सादर करणेत येवून त्यास एकमताने मंजूरी देणेत आला. मलकापूर पालिकेचा 2023-24 सालचा एकूण 59 कोटी 40 लाखांच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आल्याची माहिती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. निलम येडगे यांनी दिली.

मलकापूर नगरपरिषदेने या अर्थसंकल्पामध्ये नगरपरिषदेकडून कार्यरत असणाऱ्या विविध नाविण्यपुर्ण योजनांसाठी अर्थसंकल्पीय तरतुद केली असून, यामध्ये प्रामुख्याने १) प्रियदर्शनी कन्यारत्न योजना, २) श्रीमती प्रेमलाताई चव्हाण कन्यासुरक्षा अभियान, ३) महात्मा गांधी दिव्यांग पेंशन योजना, ४) मलकापूर सोलर सिटी प्रकल्प या बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे. याबरोबरच माझी वसुंधरा योजने अंतर्गत हरित मलकापूर योजने अंतर्गत वृक्ष संवर्धन व कृषी संवर्धनासाठी रक्कम रु.१०.०० लक्ष, आजी माजी सैनिक व त्यांच्या कुटूंबाच्या कल्याणासाठी शौर्य सन्मान योजनेकरीता रक्कम रु.५.०० लक्ष, दिव्यांगांसाठी विशेष योजना राबविणेकरीता रक्कम रु.१५.०० लक्ष इ. बाबींसाठी अंदाजपत्रकामध्ये महत्वपुर्ण तरतुद करण्यात आलेली आहे.

यावर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये संयुक्त राष्ट्र संघाने सन २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पोष्टीक तृणधान्य वर्ष म्हणून जाहिर केले असून, त्याअनुषंगाने तृणधान्य पिकांच्या उत्पन्नात वाढ व लोकांच्या आहारातील वापर वाढीच्या दृष्टीने मुल्यवर्धीत उत्पादने निर्माण करणे याकरिता नगरपरिषदेच्या अंदाजपत्रकामध्ये ५% निधीतून बालवाडी, अंगणवाडी व शाळांमध्ये मध्यान आहार योजनेअंतर्गत पोष्टीक तृणधान्यांचा समावेश आर्थिक तरतुद करण्यात आलेली आहे. याबरोबरच राज्य शासनाने जागृक पालक सदृढ बालक ही महत्वकांक्षी अभियानाची घोषणा केली असून, याअंतर्गत ० ते १८ वयोगटातील मुले व मुलींची तपासणी करुन त्यांच्यावर उपचार व सेवा पुरविण्यात येणार असून, यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभाग आवश्यक असलेने याकरीता ५% निधीतून रक्कम खर्च केली जाणार आहे. मलकापूर नगरपरिषदेने शहरातील नागरिकांसाठी हाती घेतलेल्या वाढीव २४x७ पाणीपुरवठा योजनेचे बळकटीकरण करणे, वाढीव घनकचरा प्रकल्प व सांडपाणी प्रक्रिया योजना याकरिता भरावा लागणाऱ्या स्व: हिश्याची रक्कम उभारण्यात येणार असून, त्याची तरतुद करण्यात आली आहे.

सन २०२३-२४ सालचे अंदाजपत्रकामध्ये विशेष तरतुदी करण्यात आली असून, मलकापूर नगरपरिषद कार्यक्षेत्राचे नगरभूमापन करणेसाठी राज्य शासनाकडून रक्कम रु.१.०० कोटीचा निधी मंजूर झाला असून, उर्वरित लागणारी रक्कम रु.५०.०० लक्ष नगरपरिषदेने तरतुद केलेली आहे. तसेच नगरपरिषदेने शहरातील विकास कामांसाठी नगरपरिषदेकडे तरतुद केली असून, याकरिता रक्कम रु.५०.०० लक्षची तरतूद केलेली आहे. तसेच मलकापूर नगरपरिषद नविन प्रशासकीय इमारतीचे कामासाठी रक्कम रु.१.०० कोटी, शहरातील रस्ते तयार करणेकरीता रक्कम रु.२.५० कोटी व नगरपरिषद ई-वाहनासाठी रक्कम रु.१६.०० लक्षची तरतुद सदरच्या अंदाजपत्रकामध्ये करण्यात आलेली आहे.

मलकापूर नगरपरिषदेस संकलित कर, पाणी पट्टी तसेच विविध प्रकारचे दाखले, परवाने, सुरक्षा अनामत, बयाणा रक्कम इ. पासून महसूली जमा रक्कम रु.३०,४०,१३,५४६/- गृहीत धरली असून, केंद्र शासन, राज्य शासन व जिल्हा स्तरावरुन एकूण भांडवली जमा रक्कम रु.२८,९२,१५,०००/- गृहीत धरली असून, सुरुवातीची शिल्लक रक्कम रु.७,७५,९९९/- अशी एकूण सन २०२३-२४ सालची जमा रक्कम रु.५९,४०,०४,५४५/- धरणेत आलेली असून, नगरपरिषदेची भांडवली खर्चास एकूण खर्च रक्कम रु.५९,३०,२८,५४६/- गृहीत धरणेत आलेली असून, रक्कम रु.९,७५,९९९/- अंदाजपत्रक मंजुर करुन ते अंतिम मंजुरीसाठी मा. जिल्हाधिकारी, सातारा यांचेकडे सादर करणेसाठी मंजुर करण्यात आलेला आहे.