मध्यमवर्गीय तरुणांसाठी तुम्ही नेहमीच हिरो; मनमोहन सिंग यांच्या निवृत्तीनंतर खर्गेंचं भावनिक पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते मनमोहन सिंग (Manmohan Singh) हे राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत. आता मनमोहन सिंग आपल्याला राज्यसभेत दिसणार नाहीत. मनमोहन सिंग यांच्या निवृत्तीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी त्यांच्यासाठी भावनिक पत्र लिहीत मनमोहन सिंग यांच्या कार्यांचे आणि धोरणात्मक निर्णयाबद्दल आभार मानत मनमोहन सिंग यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. मी तुमच्या मंत्रिमंडळाचा एक भाग बनलो ही माझ्यासाठी बहुमानाची गोष्ट आहे असेही खर्गे यांनी म्हंटल.

खर्गे यांचं पत्र जसच्या तसे –

मनमोहन जी, तीन दशकांहून अधिक काळ सेवा केल्यानंतर आज तुम्ही राज्यसभेतून निवृत्त होत आहात, तेव्हा एका युगाचा अंत झाला आहे. तुमच्यापेक्षा जास्त समर्पणाने आणि निष्ठेने त्यांनी देशाची सेवा केली असे फार कमी लोक म्हणू शकतात. देशासाठी आणि जनतेसाठी तुमच्याइतके काम फार कमी लोकांनी केले आहे. तुमच्या मंत्रिमंडळाचा भाग असणे हा माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये, मी लोकसभा आणि राज्यसभेत काँग्रेस पक्षाचा नेता असताना, तुम्ही नेहमीच माझ्या विचारपूर्वक कामासाठीचे स्रोत राहिला. गेल्या काही वर्षांमध्ये, वैयक्तिक अडचणीअसतानाही तुम्ही काँग्रेस पक्षासाठी उपलब्ध राहिला त्यासाठी पक्ष आणि मी सदैव ऋणी राहू.

खरगे यांनी आपल्या पत्रात पुढे लिहिले की, ‘मोठे उद्योग, तरुण उद्योजक, छोटे व्यवसाय, पगारदार वर्ग आणि गरिबांसाठी तितकीच फायदेशीर आर्थिक धोरणे राबवणे शक्य आहे हे तुम्ही दाखवून दिले आहे. देशाच्या विकासात गरीबही सहभागी होऊ शकतो आणि गरिबीतून बाहेर येऊ शकतो हे तुम्हीच दाखवून दिले. तुमच्या धोरणांमुळे, तुमच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात, भारताने 27 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात यश मिळवले, जे जगातील गरिबीतून बाहेर काढलेल्या लोकांची सर्वात मोठी संख्या आहे.

खरगे यांनी आपल्या पत्रात मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात मनरेगा योजना आणि अणुकराराचाही उल्लेख केला आहे. ओबामांनी मनमोहन सिंग यांचा उल्लेख केला होता, त्यावर खरगे म्हणाले, ‘मला आठवते राष्ट्राध्यक्ष ओबामा तुमच्याबद्दल म्हणाले होते की, भारतीय पंतप्रधान जेव्हा बोलतात तेव्हा संपूर्ण जग त्यांचे ऐकते. राष्ट्रासाठी तुमच्या अनेक योगदानांपैकी ही काही उदाहरणे आहेत ज्यांचा मी उल्लेख करत आहे. आम्ही अशा काळात जगतो ज्या काळात तुम्ही देशाला आकार दिला. आज आपण जी आर्थिक सुबत्ता आणि स्थैर्य अनुभवत आहोत ती आपले माजी पंतप्रधान भारतरत्न पी.व्ही. नरसिंह राव यांच्यामुळे. त्यांच्यासोबत तुम्ही महत्वाचं काम केलं. पण तुमच्या या कामाचा फायदा घेणारे सध्याचे नेते राजकीय पक्षपातीपणामुळे तुमचे श्रेय द्यायला तयार नाहीत. किंबहुना, ते तुमच्याबद्दल वाईट बोलून तुमच्यावर वैयक्तिक हल्ले करताना दिसतात. तथापि, आम्ही हे देखील जाणतो की तुम्ही इतके मोठे मनाचे आहात की तुम्ही कोणाच्याही विरोधात नाही.

सध्याच्या सरकारने केलेल्या छोट्या छोट्या सुधारणांची बीजे तुमच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने सुरू केलेल्या कामात आहेत. शून्य शिल्लक खाती तयार करून वैयक्तिक लाभार्थींना थेट लाभ हस्तांतरित करता यावेत यासाठी तुमच्या सरकारने सुरू केलेले काम, आधारद्वारे लाभार्थींची विशिष्ट ओळख तुम्हाला क्रेडिट न देता नंतरच्या सरकारने हायजॅक केली. काही प्रकरणांमध्ये, आपण सुरू केलेले चांगले कार्य हळूहळू पूर्ववत होताना दिसते.

मध्यमवर्गीय आणि महत्त्वाकांक्षी तरुणांसाठी तुम्ही नेहमीच एक नायक, उद्योगपती आणि उद्योजकांसाठी एक नेता, मार्गदर्शक आणि तुमच्या आर्थिक धोरणांमुळे गरिबीतून बाहेर पडू शकलेल्या सर्व गरीबांसाठी आदर्श राहाल. तुम्ही सक्रिय राजकारणातून निवृत्त होत असतानाही, मला आशा आहे की तुम्ही शक्य तितक्या वेळा देशातील नागरिकांशी बोलून देशासाठी शहाणपणाचा आणि नैतिकतेचा मार्ग दाखवत राहिलात. त्यामुळं मी तुमच्या शांत, आरोग्य आणि आनंदायी आयुष्याची इच्छा व्यक्त करतो.