हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| वाहनचालकांसाठी नुकतीच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता इथून पुढे वाहनासाठी थर्ड पार्टी विमा असणे अनिवार्य असणार आहे. नव्या नियमानुसार, जर वाहनचालकाकडे वैध थर्ड पार्टी विमा (third party insurance) नसेल, तर त्यांना पेट्रोल किंवा डिझेल खरेदी करता येणार नाही. इतकेच नव्हे, तर फास्टॅगशी संबंधित व्यवहारांसाठीही विमा दाखल करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
सरकारच्या या नव्या नियमांनुसार, वाहनचालकांनी त्यांच्या फास्टॅग खात्यासोबत थर्ड पार्टी विमा लिंक करणे आवश्यक आहे. पेट्रोल पंपावर इंधन खरेदी करण्यासाठी वाहनाचा विमा वैध असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. याशिवाय, लायसन्स नूतनीकरण, प्रदूषण प्रमाणपत्र तसेच इतर सुविधांचा लाभ घेण्यासाठीही विम्याचे कागदपत्र आवश्यक ठरणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना लवकरात लवकर त्यांच्या गाडीचा विमा घ्यावा लागणार आहे.
मोटर वाहन कायद्यानुसार भारतात सर्व वाहनांसाठी थर्ड पार्टी विमा अनिवार्य आहे. दुचाकी असो वा चारचाकी, प्रत्येक वाहनधारकाने आपली विमा पॉलिसी अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे आता नवीन नियमांचे पालन न केल्यास वाहनचालकांना मोठ्या दंडाला सामोरे जावे लागणार आहे. महत्वाचे म्हणजे, थर्ड पार्टी विमा फक्त कायद्याचे पालन करण्यासाठीच नाही तर वाहन अपघातात इतर व्यक्तींना झालेल्या नुकसानीपासून संरक्षण देतो.
जर वाहनाच्या अपघातात कोणत्याही तृतीय पक्षाचे नुकसान झाले, तर थर्ड पार्टी विमा त्या व्यक्तीच्या आर्थिक नुकसानीची भरपाई करतो. त्यामुळे हा विमा केवळ बंधनकारक नसून सुरक्षेच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा आहे. दरम्यान, सरकारने आता नवीन विमा खरेदी करताना फास्टॅगशी थर्ड पार्टी विमा लिंक करणे अनिवार्य केले आहे. यामुळे पेट्रोल पंप आणि टोल नाक्यावर फास्टॅग प्रणालीद्वारे विमा तपासला जाणार आहे.
या नव्या नियमानुसार, वाहनचालकांनी विम्याचे नूतनीकरण वेळेवर करणे आणि त्याचे आवश्यक दस्तऐवज सोबत ठेवणे गरजेचे असणार आहे. या कठोर नियमांमुळे रस्ते अपघातात नुकसानग्रस्त व्यक्तींना मदत मिळण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.