Sunday, May 28, 2023

गौतमीच्या ‘त्या’ व्हिडिओवर तमाशा सम्राज्ञी मंगला बनसोडेंची प्रतिक्रिया; केलं ‘हे’ आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलचा एका कार्यक्रम दरम्यानचा कपडे बदलत असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गौतमीच्या व्हिडिओवर कराड तालुक्यातील करवडीतील प्रसिद्ध तमाशा सम्राज्ञी मंगला बनसाडे-करवडीकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “महिला कलावंताचा असा व्हिडिओ काढून तो व्हायरल करणे निंदनीय आहे. आपला महाराष्ट्र हा जिजाऊंचा, माता रमाबाई आणि सावित्रीबाईंचा आहे. युपी अथवा बिहार नाही. महाराष्ट्रातील आपल्याच कलावंताची हेटाळणी का करता? तसे कोणीही करू नये, असे आवाहन बनसोडे यांनी केले आहे.

मंगला बनसोडे यांनी गौतमीच्या व्हायरल व्हिडिओबाबत प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडिओत बनसोडे यांनी म्हंटले आहे की, महिला कलावंताचा असा व्हिडिओ काढून तो व्हायरल करणे निंदनीय आहे. गौतमी पाटील ही महाराष्ट्रातील लोककलावंत आहे. ती आधी एक स्त्री आहे आणि मग कलावंत आहे. गौतमीच्या हावभावाच्या नृत्याबद्दल आपण आक्षेप घेतला. तो देखील बरोबर आहे. त्याबद्दल तिने माफीही मागितली. परंतु, ड्रेसिंग रुममध्ये कपडे बदलतानाचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करने हे निंदनीय आहे. कृपया असे करु नये.

अनेक हिंदी चित्रपटातील कलाकार बाहेरून आपल्या महाराष्ट्रात आले. आपल्या पाच पिढ्या बसून खातील एवढा पैसा ते कमावून बसले आहेत. मग या आपल्या महाराष्ट्रात आपल्याच कलाकारांची आपण हेटाळणी का करताय? असा सवाल बनसोडे यांनी केला.

मंगला बनसोडे करवडीकर या महाराष्ट्रातील प्रसिध्द तमाशा लोककलावंत आहेत. आजोबा भाऊ मांग नारायणगावकर, आई विठाबाई यांच्यानंतर त्यांची मुलगी मंगला बनसाडे-करवडीकर अशा तीन पिढ्यांना लोककलेतील योगदानाबद्दल राष्ट्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.