Manohar Joshi : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं दुःखद निधन (Manohar Joshi Death) झालं. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांची प्राणजोत मालवली. मनोहर जोशी हे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री ठरले होते, बाळासाहेब ठाकरेंचे (Balasaheb Thackeray) अत्यंत विश्वासू अशी त्यांची ओळख होती. मात्र ज्या बाळासाहेब ठाकरेंनी मनोहर जोशी यांना राज्याचे मुख्यमंत्री केलं, त्याच बाळासाहेबांच्या एका आदेशावर जोशींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही दिला होता. त्यावेळी नेमकं घडलं काय होत हे आज आपण जाणून घेऊया..
नेमकं काय घडलं? Manohar Joshi
1995 साली शिवसेना-भाजपा युतीचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात प्रथमच शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली. बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळी मनोहर जोशी याना विश्वासाने मुख्यमंत्री केल. बाळासाहेब ठाकरेंना ऊठ म्हटलं की उठणारा आणि बस म्हटलं की बसणारा मुख्यमंत्री हवा होता. जोशी बाळासाहेबांचे विश्वासू होते, मात्र शिवसेनाप्रमुखांशी त्यांचे अधूनमधून वादाचे प्रसंग उद्भवू लागले. परंतु मातोश्रीवर दोघांमध्ये चर्चा झाल्यानंतर वाद्यांवर पडदा पडत असे. मनोहर जोशी यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात अनेक धडाडीचे निर्णय घेतले. मनोहर जोशी यांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द ऐन भरात आली होती. त्याच वेळी मनोहर जोशी यांचे जावई गिरीश व्यास यांच्यासाठी पुण्यातील एका शाळेसाठी राखून ठेवण्यात आलेल्या भूखंडाचे आरक्षण बदलण्यात आल्याचा आरोप झाला आणि त्यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं.
मनोहर जोशी यानी मुख्यमंत्रीपद सोडताना कोणतीही खळखळ न करता बाळासाहेबांच्या एका आदेशावर राजीनामा दिला. त्यावेळी मातोश्रीवरून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी म्हणजे वर्षावर एक पत्र आलं होते. त्या पत्रात मनोहर जोशींना असं सांगण्यात आलं होत, आधी राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांच्याकडे राजीनामा द्या आणि मगच मला भेटायला या. जोशींना साहेबांचा आदेश पाळला आणि एका क्षणात आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला. अचानक मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या मनात बाळासाहेब ठाकरेंबद्दल कोणतीही वाईट किंवा चुकीची भावना नव्हती.
नंतरच्या काळात त्यांना मुख्यमंत्री पद गेल्याबाबत विचारलं असता मनोहर जोशी (Manohar Joshi) म्हणाले होते, 1999 साली एका गैरसमजातून मुख्यमंत्रीपद गेले. जो पद देतो त्याला ते काढण्याचा अधिकार आहे. ज्यावेळी बाळासाहेबांनी मला मुख्यमंत्री केले तेव्हा का केले असे विचारले नाही. त्यामुळे राजीनामा देण्याचे आदेश त्यांनी दिले तेव्हा लगेच राजीनामा दिला. 1995 साली मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी मी आणि सुधीर जोशी दोघेही बाळासाहेबांना भेटलो होतो. साहेबांनी मला पसंती दिली. प्रेयसीला आपण विचारतो का, माझ्यावरच का प्रेम केले? बाळासाहेबांचे माझ्यावर नितांत प्रेम होते म्हणूनच शिवसेनेतील सर्व पदे मला मिळाली. उद्धव ठाकरेंचीही माझ्यावर प्रेम आहे असं त्यावेळी मनोहर जोशी यांनी सांगितले होते.