मनोज जरांगेंची प्रकृती पुन्हा खालवली; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

0
8
Manoj Jarange
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची प्रकृती अचानक खालावली आहे. सध्या त्यांना छत्रपती संभाजीनगर (Chattrapati Sambhajinagar) येथील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात होती. मात्र आज सकाळी अंतरवाली सराटी येथे भेटीसाठी आलेल्या कार्यकर्त्यांसमोरच त्यांना भोवळ आली. यामुळे त्यांच्या तब्येतीबाबत कार्यकर्ते चिंतेचे पडले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास सामाजिक कार्यकर्ते सुरेश वाकडे पाटील आणि अन्य कार्यकर्ते त्यांना भेटण्यासाठी अंतरवाली सराटी येथे पोहोचले होते. त्याचवेळी, मनोज जरांगे पाटील यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि काही क्षणांतच ते चक्कर येऊन खाली कोसळले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांना खासगी वाहनाने छत्रपती संभाजीनगरातील गॅलेक्सी रुग्णालयात हलवले.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक वेळा बेमुदत उपोषण केले आहे. त्यांच्या या लढ्याचा मोठा परिणाम त्यांच्या आरोग्यावर झाल्याचे बोलले जात आहे. दीर्घकाळ उपोषण, अनियमित आहार आणि मानसिक ताणतणाव यामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होत असल्याचे डॉक्टरांनी यापूर्वीच सुचवले होते. मात्र या सगळ्याकडे जरांगे यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले. परिणामी आज पुन्हा एकदा त्यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्याची बातमी समजताच त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक कार्यकर्ते आणि समाजबांधव रुग्णालयात दाखल झाले आहेत. सध्या जरांगे यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी देखील आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली आहे.