मनोज जरांगेंची प्रकृती चिंताजनक! नाकातून रक्त, उपचार घेण्यास नकार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सगेसोयरे कायद्यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. परंतु उपोषणाच्या पाचव्या दिवशी त्यांची प्रकृती ढासळली आहे. आज सकाळपासून मनोज जरांगे यांच्या नाकातून रक्त येत आहे. असा त्रास होत असताना देखील त्यांनी उपचार घेणे नाकारले आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.

मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु मुंबईच्या वेशीपर्यंत जाताच सरकारने जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. या मागण्यांना घेऊन सरकारने जीआर देखील काढला. परंतु सरकारने या मागण्या मान्य केल्या असल्या तरी याची अंमलबजावणी अद्याप करण्यात आलेली नाही. त्यामुळे जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सतत करण्यात येत असलेल्या उपोषणामुळे जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली आहे.

आज सकाळपासूनच मनोज जरांगे पाटील यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत आहे. त्यामुळे उपचारासाठी डॉक्टरांना देखील बोलवण्यात आले होते. परंतु कोणतेही उपचार घेण्यास त्यांनी नकार दिला. तसेच देण्यात आलेले पाणी देखील पिण्यास नाकारले. त्यामुळे आजूबाजूला बसलेल्या लोकांना अश्रू अनावर झाले. मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडत झाल्यामुळे सर्वजण चिंतेत पडले आहेत. तसेच त्यांना उपचार घेण्यास सांगत आहेत. परंतु जोपर्यंत सरकार मागण्यांची अंमलबजावणी करत नाही, तोपर्यंत आपण पाणीही पिणार नाही, असा निर्धार जरांगे पाटील यांनी केला आहे.