ठोकर खाणाऱ्या दगडांच्या रस्त्यावरील गप्पा..!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जरा हटके | रस्त्याच्या कडला कधी काळी काम रखडल्यामुळं थोडी अस्ताव्यस्त पडलेली रोजगार हमीची दगडी.. सरकारी कामाच्या ठरलेल्या लेट आदेशामुळं कामगारांनी काही महिन्यांनी फोडायला घेतली.. तेव्हा त्यातलं तुकडं झालेलं काही बारकं दगड एकमेकाला म्हणत होतं..
इथं एका कडला होतं तेच बर होतं रं..
गावातलं पोरांचं टोळकं येऊन रोज आपला आधार घेऊन बसायचं..गावच्या खबरी कळायच्या,राजकारण कळायचं,पोरांनी एकमेकाला घातलेल्या शिव्या कधी चुकल्या नाहीत,चर्चा व्हायच्या,रातभर गप्पा रंगायच्या,चुना तंबाखुच्या पुड्या सुटायच्या..सकाळ,दुपार संध्याकाळ असो नाहितर रात्र..आपला आधार घेऊन काळ वेळ घड्याळ न पाहता बसलेली माणसं,पोरं आता पांगली रं.. अन आपल्या नशीबी उरला आता फक्त ह्यो डांबरी रस्ता..ज्याचा अंत कुठवरय हे आपल्यालाच ठाऊक नाही..
आपण सारी दगडं इथनं हटलो की मात्र इथं पंचायतीतर्फे बाकडी येणारयत ऐकलं होतं मागं एकाकडनं..
पण बाकड्याव अशी किती जणं बसणार रं..

जाऊदेल..

तेवढ्यात हे ऐकणार्याच्या एका दगडाच्या तुकड्यावर हातोडा बसला अन ऐकणारा दगड गपगार झाला..
बोलणारा दगड ही क्षणभर शांत बसला..
बाकी आसपासची ही त्यांच ऐकता ऐकता गप्प राहिली..
तेवढ्यात तिथं ठेकेदार आला अन काहितरी सांगुन तिथनं निघुन गेला..
कामगारानं कामाचा वेग वाढवला होता..
दगडी आता बारीक होऊन दाटीवाटीत पसरलेली होती..
अन बोलणारा दगड त्याच्यावर हातोडा पडण्याआधी अखेरचं बोलता झाला..,

पुन्हा नंतर ही कधीतरी इथं दगडी पडतीलच की..

न्हाय का रे..
तेव्हा पुन्हा आपल्यासारखच कुणीतरी इथं या लोकांना बसायला काहीकाळ आधार होईल..ती सुधा दगड असली तरी किमान ही माणसं असेस्तोवर ती या माणसात राहतील इतकच..बाकी पुन्हा आपल्या नशीबी रस्ता कधी चुकलाय का..या माणसांच ऐकताना हे माणुसपण आपल्या ही नशिबी का नाही असं वाटायच.. ..साला शेवटपर्यत आपण दगड दगड अन दगडच रे..आणि तेवढ्यात त्या बोलत्या दगडावर कामगारानं हातोडा टाकला..अन त्याच्या घामाचा थेंब..बोलत्या दगडाच्या दुसर्या तुकड्यावर टपकन पडला..बाकीची पसरलेली बारीक दगडी आता पुर्णपणे शांत झाली..

इकडे मात्र रोज त्या दगडांवर बसणारं टोळकं गावच्या बस स्टॅंडात बरं झालं रस्ता व्होतोय गावात म्हणत तालुक्यातल्या रस्त्यांपेक्षा हायवे किती गुऴगुळीत असतात यावर बराचवेळ चर्चा करत बसलं होतं..

विकी पिसाळ
 9762511636