Olympics 2024 Manu Bhaker : ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले मेडल; मनू भाकरने मिळवलं कांस्य पदक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला आज पहिले पदक मिळाले आहे. भारतीय नेमबाज मनू भाकरने इतिहास रचत कांस्य पदक पटकावलं आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू भाकर ही पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. तर ऑलिम्पिकच्या इतिहासातील नेमबाजीतील भारताचे हे पाचवे पदक ठरले. मनूने अंतिम फेरीत एकूण 221.7 गुण मिळवले. याच स्पर्धेत कोरियन खेळाडू ओ ये जिनने सुवर्ण (२४३.२ गुण) आणि किम येजीने (२४१.३) रौप्यपदक जिंकले. कृष्णाने अर्जुनाला केवळ लक्ष्यावर ध्यान देण्यास सांगितलं होतं, तेच फायनलमध्ये माझ्या डोक्यात सुरू होतं, असं मनू भाकरने कांस्य पदक जिंकल्यानंतर सांगितलं.

फायनलमध्ये मनू भाकरचा स्कोर

पहिली 5 शॉट सीरीज: 10.6, 10.2, 9.5, 10.5, 9.6, एकूण 50.4
दुसरी 5 शॉट मालिका: 10.1, 10.3, 9.6, 9.6, 10.3, एकूण: 49.9
उर्वरित शॉट्स: 10.5, 10.4, 9.8, 9.8, 9.9, 10.2, 10.1, 10.2, 10.1, 10.0, 10.1,10.3

कोण आहे मनु भाकर –

मनु भाकरचा जन्म 18 फेब्रुवारी 2002 रोजी झज्जर, हरियाणा येथे झाला आहे. मनूने लहानपणापासूनच खेळात रस दाखवला. नेमबाजीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्वात आशादायी तरुण खेळाडूंमध्ये तीच नाव अग्रस्थानी घेतलं जातं. मनू भाकरने आपल्या नेमबाजी करिअरमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. तिने पिस्तुल नेमबाजीत आपल्या विलक्षण कौशल्याने आंतरराष्ट्रीय क्षेत्रात नाव कमावले आहे. जागतिक नेमबाजीत मनू भाकरनं आतापर्यंत दोन सांघिक पदकं मिळवलेली आहेत. तर नेमबाजी विश्वचषकात तिला नऊ सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं मिळालेली आहेत. मनू भाकरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदक मिळवलं आहे.