Tuesday, January 7, 2025

मराठा बांधवांच्या प्रश्नांना उत्तरे देताना भाजप खासदाराच्या नाकीनऊ; निवडणुकीपूर्वी वातावरण तापलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यातील लोकसभा निवडणूक जवळ आल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक पक्ष वेगवेगळ्या भागात जाऊन संघटन बांधणी आणि प्रचार करताना दिसत आहेत. परंतु, मत मागायला दारात आलेल्या याच पक्षांना मराठा बांधवांनी विरोध दर्शवला जात आहे. रविवारी सोलापूरचे, भाजपचे खासदार जयसिध्देश्वर महाराज तरटगाव (ता. मोहोळ) येथे गेले असता त्यांना मराठा आंदोलकांनी सरकारने घेतलेल्या भूमिकेबद्दल जाब विचारण्यात आला. यावेळी “एक मराठा लाख मराठा” अशा घोषणा देखील आंदोलकांनी दिल्या.

समोर आलेल्या माहितीनुसार, रविवारी एका कार्यक्रमानिमित्त भाजपचे खासदार जयसिध्देश्वर महाराज तरटगाव येथे गेले होते. तेव्हा त्यांचा हा कार्यक्रम सुरू असतानाच मराठा आंदोलकांनी जयसिध्देश्वर महाराज यांना घेरले. यानंतर, ॲड. श्रीरंग लाळे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने घेतलेल्या भूमिकेला विरोध दर्शवत “सरकारने सगेसोयरे कायद्याचे अंमलबजावणी का केली नाही” असा प्रश्न उपस्थित केला. पुढे, “जयसिध्देश्वर यांनी अजूनही मराठा आरक्षणाचा मुद्दा लोकसभेत का मांडला नाही” असा देखील जाब विचारला.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Adv Shreerang Lale (@adv.shreerang_lale)

यावेळी, मराठा आंदोलकांच्या प्रश्नांची उत्तरे देताना जयसिध्देश्वर महाराज यांच्या नाकीनऊ आल्याचे दिसून आले. मुख्य म्हणजे, सरकारने मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण न दिल्यामुळे यावर मराठा आंदोलकांनी संताप व्यक्त केला. याचबरोबर, “सत्ताधारी आणि विरोधातील खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधी यांना आमच्या मागण्यांची चाड आणि गांभीर्य नसेल तर त्यांनी आमच्या दारात येऊन मते मागायचा काहीएक संबंध नाही.” अशी भूमिका घेतली.

दरम्यान, राज्य सरकार मराठा समाजाच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करत नसल्यामुळे “लोकशाही व्यवस्थेत जनता मालक असते आणि ज्या मालकाची तूम्ही चेष्टा करण्याच्या प्रयत्न करत आहेत ती तुम्हाला जागा दाखवून देईल. आरक्षणावर ठोस भूमिका घेतली जाणार नाही तोपर्यंत संविधानिक मार्गाने आंदोलन सुरू राहील” अशी ठोस भूमिका तरटगाव येथील मराठा आंदोलकांनी घेतली आहे. त्यामुळे, आता निवडणुकीच्या तोंडावर सरकार मराठा समाजाच्या मागण्यांचा विचार करेल की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.