सातारा । भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhonsle) यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना उत्तर दिलं आहे. “भुजबळ हे वयाने मोठे आहेत. माझा अभ्यास कमी असला तरी कॉमन सेन्स का कॉमन आहे मला माहित नाही”, असा टोमणा उदयनराजे भोसले यांनी लगावला. उदयनराजे भोसले यांचा आरक्षणाचा (Maratha Reservation) अभ्यास कमी आहे, असं छगन भुजबळ म्हणाले होते. त्यावर उदयनराजेंनी भाष्य केलं.
उदयनराजे म्हणाले, “छगन भुजबळ हे वयाने मोठे आहेत. त्यांचा गाढा अभ्यास आहे मी मान्य करतो. माझा अभ्यास कमी असला तरी कॉमन सेन्स का कॉमन आहे मला माहित नाही. इतरांबरोबर मराठा समाजाला पण न्याय मिळाला पाहिजे यात अभ्यास काय करायच?”
व्हाय इज कॉमन सेन्स कॉमन
“व्हाय इज कॉमन सेन्स कॉमन, खरंच मला कळत नाही. त्यांचा फार मोठा अभ्यास. कॉमन सेन्स त्यांचा काय कुणाचाच, मला त्यांच्यावर आरोप करायचा नाही. पहिल्यापासून आरोप प्रत्यारोप होत आहेत. मला त्यात जायचं नाही. मला एव्हढंच सांगायचं आहे, बाकीच्या समाजाचं जसं आरक्षण आहे, तसं मराठा समाजालाही न्याय मिळायला हवा, त्यात अभ्यासाचं काय?” असा सवाल उदयनराजे भोसले यांनी विचारला.
छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले होते?
मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत उदयनराजेंचा अभ्यास कमी आहे, असं भाष्य छगन भुजबळ यांनी केलं होतं. उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षण मिळायलाच हवं अशी भूमिका घेतलीत आहे. मराठा आरक्षणाबाबतच्या सरकारच्या भूमिकेवर सपाटून बोलणार आहे, असं उदयनराजे म्हणाले होते. आरक्षण हे गुणवत्तेनुसारच मिळाले पाहिजे, या भूमिकेचा पुनरुच्चारही त्यांनी केला होता. सर्वोच्च न्यायालयात 9 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली होती. नोकरी आणि शैक्षणिक आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे राज्यातील मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’