हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| वर्षातील मार्च महिना सण- उत्सवांनी गजबजलेला असतो. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना (School Students) मार्च महिन्यात सर्वाधिक सुट्ट्या असतात. यंदाच्या वर्षी ही अनेक महत्त्वाचे सण आणि सार्वजनिक सुट्ट्या एकत्र आल्याने विद्यार्थ्यांना जास्त प्रमाणात सुट्ट्यांचा आनंद लुटता येणार आहे.
सलग सुट्ट्यांची संधी
या महिन्यात होळी, गुढी पाडवा, ईद-उल-फितर यांसारखे महत्त्वाचे सण आहेत. ज्यामुळे विद्यार्थ्यांना सलग सुट्ट्यांचा लाभ मिळू शकतो. १३ आणि १४ मार्चला अनुक्रमे होलिका दहन आणि धुलिवंदन साजरे होणार आहेत. त्यामुळे अनेक शाळा या दोन दिवसांसाठी बंद राहतील. त्यानंतर, २८ मार्चला जमात उल विदा आणि ३० मार्चला गुढी पाडवा असल्याने काही शाळांना या दिवशीही सुट्टी मिळेल. ३१ मार्चला ईद-उल-फितरचा सण असून, चंद्रदर्शनानुसार सुट्टीची तारीख निश्चित केली जाईल.
याशिवाय, २, ९, १६, २३ आणि ३० मार्च हे रविवार असल्यामुळे शाळांना नियमित सुट्टी असेल. काही शाळांमध्ये शनिवारीही सुट्टी असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या ब्रेकचा आनंद घेता येईल.
महत्त्वाचे राष्ट्रीय आणि जागतिक दिवस
मार्च महिन्यात विविध महत्त्वाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दिवस येतात. ८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन, १५ मार्चला जागतिक ग्राहक हक्क दिवस, २२ मार्चला जागतिक जल दिन आणि २३ मार्चला जागतिक हवामान दिन यांसारख्या महत्त्वाच्या तारखांची नोंद घेतली जाते. त्याशिवाय, २९ मार्चला गुड फ्रायडे असल्याने काही शाळा या दिवशीही बंद राहतील.
दरम्यान, मार्च २०२५ हा सुट्ट्यांनी भरलेला महिना असल्याने विद्यार्थी आणि पालक याचा विविध पद्धतीने उपयोग करू शकतात. या काळात अनेकजण सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी बाहेर फिरायला जातात. तर काहीजण उन्हाळ्याच्या तयारीसाठी मुलांना विविध शिबिरांमध्ये सहभागी करतात. मार्चपासून उन्हाळ्याचा काळ सुरू होत असल्यामुळे हे दिवस मुलांसाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करण्याचे असतात.