पार्थच्या उमेदवारीसाठी श्रीरंग बारणेंना मावळचा बालेकिल्ला सोडावा लागणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पवार कुटुंबातला नवा नवखा तरी पण तिसऱ्या पिढीतील राजकारणात उतरू पाहणारा चेहरा म्हणजे पार्थ पवार (Parth Pawar) .पवार लढले आणि हरले.. असं कधी होत नाही. पण याला ब्रेक लागला. राजकारणातील दादा म्हणून ज्यांचा पुऱ्या महाराष्ट्रावर वचक राहिलाय. त्या अजित पवारांचा मुलगा मावळमधून खासदारकीच्या रिंगणात उतरला मात्र त्याला पराभवाचा अनपेक्षित धक्का पचवावा लागला. पवार कुटुंबाच्या राजकीय जीवनातील हा पराभवाचा ओरखडा काही केल्या पुसता येणार नाही हेही तितकंच खरं. राष्ट्रवादीतील अंतर्गत फाटाफूट आणि नाराजी याच निकालानंतर समोर आल्याचं बोललं जातं. पण बाकीचे पर्याय असताना अजितदादांनी आणि पक्षाने पार्थ यांना मावळातूनच तिकीट का देऊ केलं? मावळात प्रस्थापित असणाऱ्या शिवसेनेच्या श्रीरंग आप्पा बारणे यांना सलग तीन टर्म निवडून येत मावळवासियांची नस कशी सापडलीय? दोन महत्वाचे पक्ष फुटल्याने मावळमधील राजकारणावरही याचे काही पडसाद उमटणार का? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पार्थ पवार यंदाही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? याकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे लक्ष्य आहे.

2009 साली मावळ लोकसभा मतदारसंघ (Maval Lok Sabha 2024) अस्तित्वात आला तेव्हा या मतदारसंघाचा पहिला आमदार होण्याचा मान शिवसेनेचे दिवंगत नेते गजानन बाबरांना मिळाला. तेव्हापासूनच मावळात प्रत्येक निवडणुकीत भगवा फडकत राहिला. पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड आणि मावळ या तीन विधानसभा मतदार संघासह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत आणि उरण या तीन विधानसभा मतदार संघांनी बनलेला हा मतदार संघ. औद्योगिक वसाहती, धार्मिक आणि पर्यटन स्थळे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इंद्रायणी तांदळासाठी प्रसिद्ध राहिलाय.

Maval Loksabha : श्रीरंग बारणे यांना हक्काचा बालेकिल्ला सोडावा लागणार? अजितदादांच्या डोक्यात काय?

पहिल्या निवडणुकीनंतर सलग दोन टर्म म्हणजे 2014 आणि 2019 या दोन्ही वेळेस शिवसेनेचे श्रीरंग आप्पा बारणे याठिकाणी मोठ्या लीडने जिंकत आले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात घड्याळाचे काटे कुणाचे? यासाठी किंगमेकरच्या भूमिकेत असणारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर त्यावेळेस घड्याळाची एकनिष्ठ होते. म्हणूनच की काय नवखे असूनही त्यांना राष्ट्रवादीकडून 2014 साली लोकसभेचं तिकीट देण्यात आलं. राष्ट्रवादी पक्ष आणि पवार कुटुंबाने संपूर्ण यंत्रणा कामाला लावून सुद्धा त्यावेळेस त्यांना शिवसेनेचा हा बालेकिल्ला फोडता आला नाही. आणि श्रीरंग आप्पा बारणे प्रचंड बहुमताने विजयी झाले. अर्थात मोदीलाट आणि मतदारसंघातील शिवसेनेची मजबूत पकड हे ही फॅक्टर त्यावेळेस महत्वाचे ठरले. आणि अशातच 2019 ची निवडणूक आली…

मावळात सलग दोन टर्म शिवसेनेचा भगवा फडकत असल्याने 2019 ला मावळात बारणेंच्या विरोधात राष्ट्रवादीकडून कुणाला मैदानात उतरवलं जाणार? याची गोळाबेरीज चालू असताना अचानक आश्चर्यकारकरीत्या पवार कुटुंबातील तिसरी पिढी म्हणजेच अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना मावळातून तिकीट देण्यात आलं. त्यामुळे मावळात रंगत चुरशीची होणार यावर सर्वांचाच शिक्कामोर्तब झाला. पार्थला खासदार करण्यासाठी आजोबांसह वडील अजित पवारांनी जंगजंग पछाडलं.अजितदादांनी आपलं सारं राजकीय स्किल आणि ताकद लावून देखील साऱ्या महाराष्ट्रात प्रतिष्ठेच्या बनलेल्या या निवडणुकीत पार्थ पवार यांना पहिल्याच निवडणूकीत झटका बसला. आणि तब्बल पवारांच्या या तिसऱ्या पिढीतून राजकरणात उतरू पाहणाऱ्या पार्थ पवार यांचा बारणेंनी तब्बल 2 लाख 15 हजार मतांनी पराभव केला.

पण 2024 येता येता महाराष्ट्राच्या राजकारणाने अभूतपूर्व रंग पाहिले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन ग्राउंड पॉलिटिक्स हालवणाऱ्या पक्षातच दोन गट पडलेत. त्यात अजितदादा यांनी शिंदे गट आणि भाजपसोबत महायुतीच्या टॅग खाली घरोबा केल्यामुळे आता मावळात नक्की उमेदवार कोण? हा मोठा पेच आता पडला आहे. बारणे यांनी शिवसेनेच्या फुटीत शिंदेंची साथ धरल्यानं महायुतीकडून त्यांच्याच नावाला पुन्हा ग्रीन सिग्नल दिला जाऊ शकतो. मात्र अजितदादा यांचं महायुतीमधील वाढलेलं वजन पाहता त्यांनी जर का आपल्या सुपुत्रासाठी आणि पराभवाची जखम भरून काढण्यासाठी पुन्हा मावळ लोकसभेवर दावा केला तर नव्या वादाला नक्कीच तोंड फुटू शकतं. मात्र निवडणूक हरल्यानंतर पार्थ पवार मावळमध्ये साधं फिरकलेले सुद्धा नसल्याने आणि त्यांचा मावळमधील अगदीच तोकडा जनसंपर्क पाहता केवळ अजितदादांच्या पॉलिटिकल गट्सवर त्यांना पुन्हा मावळातून तिकीट देणं हे कितपत प्रॅक्टिकल आहे? हा ही प्रश्न आहेच!

मावळचं राजकारण पाहिलं तर ज्या पक्षाचे आमदार जास्त त्याचं पारड या मतदारसंघात नेहमीच जास्त राहिलंय. सध्या चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, पनवेलमध्ये भाजपचे प्रशांत ठाकूर, उरणमध्ये अपक्ष निवडून आलेले मात्र भाजप संलग्न असणारे महेश बालदी तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पिंपरीत अण्णा बनसोडे, मावळमध्ये सुनील शेळके आणि कर्जतमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे महेंद्र थोरवे हे विधानसभेचे नेतृत्व करतात. त्यामुळे आघाडीकडे या पट्ट्यातून एकही आमदार नसल्याने मावळची लोकसभा एकतर्फी होणार असं सध्या खासगीत बोललं जावू लागलंय. राष्ट्रवादीचे मावळ विधानसभेचे आमदार सुनील शेळके यांनी मात्र मावळ लोकसभा मतदारसंघावर याआधीच दावा ठोकलाय.

दुसरीकडे भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, कार्यकर्त्यांनी भावी खासदार असा उल्लेख फ्लेक्सवर केला अन मतदारसंघात ते फ्लेक्स सर्वत्र झळकवले. बरं ही ईच्छा फक्त कार्यकर्त्यांचीच नाही तर भाजपच्या वरिष्ठांनी आदेश दिला तर मी लोकसभेच्या रिंगणात उभा राहीन, असं स्वतः भेगडेंनी वक्तव्य केलंय. त्यामुळे महायुतीत एकाच वेळेस कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ असे तिन्ही पक्ष मावळसाठी धडपड करत असल्यामुळे आता तिकीट वाटपाचा फॉर्म्युला नक्की कसा ठरणार हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. या सगळ्यात मात्र महायुतीतील उमेदवाराला टक्कर देण्यासाठी आघाडी मात्र तगड्या उमेदवारासाठी अजूनही चाचपडताना दिसतेय.