हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची (Medical Aid Room) घोषणा करण्यात आली आहे. या कक्षाच्या अधिकृत लोगोचे अनावरण खुद्द काल उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेशी हा कक्ष संलग्न असणार आहे. त्यामुळे अनेक गरजू लोकांना या मदत कक्षाची मदत होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आजच्या लोगो अनावरण समारंभाला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, तसेच अर्थ व नियोजन राज्यमंत्री आशिष जैस्वाल हे मान्यवर उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांनी लोगोचे अनावरण केले.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यापूर्वी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी प्रभावीपणे राबवला होता. त्यावेळी या निधीची जबाबदारी मंगेश चिवटे यांच्याकडे सोपवण्यात आली होती. त्यांच्या प्रयत्नांमुळे हजारो गरजू रुग्णांना मदत मिळाली. या कक्षाच्या माध्यमातून तब्बल 419 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता, ज्यामुळे 51,000 हून अधिक रुग्णांचे प्राण वाचले.
आता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा एकदा मंगेश चिवटे यांच्यावरच या नव्या वैद्यकीय मदत कक्षाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हा कक्ष राज्यातील गरजू रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. गरजू लोकांना सरकारी योजनांच्या माध्यमातून तत्पर मदत मिळणार आहे. दरम्यान, या वैद्यकीय मदत कक्षाबाबतची माहिती स्वतः एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून दिली आहे.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधत काल उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची घोषणा करण्यात आली. या कक्षाच्या अधिकृत लोगोचे अनावरण माझ्या हस्ते करण्यात आले. राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग व महात्मा फुले जन आरोग्य योजनेशी हा कक्ष संलग्न असणार आहे. त्यामुळे गरजू रुग्णांना याचा मोठा फायदा मिळणार आहे. रुग्ण सेवेचा हाच वसा आणि परंपरा उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आम्ही पुढे घेऊन जात आहोत. यासाठी निस्वार्थीपणे सेवा देणाऱ्या सर्व रूग्णसेवकांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.