हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात एकीकडे गॅस, पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या किमतीमध्ये सर्वसामान्य माणसाला आधीच महागाईचा सामना करावा लागत असतानाच आता तर औषधे सुद्धा महाग होणार आहेत. १ एप्रिल २०२३ पासून पेनकिलरपासून अँटिबायोटिक्ससह अनेक अत्यावश्यक औषधांच्या किमती वाढणार आहेत. औषधांच्या किंमतीत १२ टक्क्यांनी वाढ होणार आहे. त्यामुळे देशातील लोकांच्या खिशाला आणखी चाप बसणार आहे.
सरकारने वार्षिक घाऊक किंमत निर्देशांक (WPI) मध्ये झालेल्या बदलांच्या अनुषंगाने औषध कंपन्यांना औषधांच्या किमती वाढवण्याची परवानगी दिली आहे. राष्ट्रीय औषध किंमत नियामक ऑथरिटीनं सोमवारी सांगितलं की, “सरकारद्वारे अधिसुचित WPI मध्ये वार्षिक बदल २०२२ च्या आधारे किंमती वाढू शकतात. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर औषध कंपन्यांनी देखील औषधांच्या किंमती वाढवण्याची मागणी करत आहेत.
टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, पेनकिलर, अँटी-इन्फेक्टीव्ह, अँटीबायोटिक्स आणि हृदयाच्या औषधांसह सुमारे 900 औषधांच्या किंमती मध्ये १२ टक्क्यांनी वाढ होणार आहे . सलग दुसऱ्या वर्षी औषधांच्या किमतीमध्ये परवानगीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. शेड्यूल ड्रग्ज म्हणजे अशा प्रकारची औषधे ज्यांच्या किंमती सरकारच्या नियंत्रणात असतात. त्यामुळं सरकारच्या परवानगी शिवाय या प्रकारच्या औषधांच्या किंमती वाढू शकत नाहीत. तर उर्वरित औषधे नॉन शेड्यूल्ड औषधांच्या श्रेणीत येतात आणि त्यांच्या किमती 10 टक्क्यांपर्यंत वाढवल्या जाऊ शकतात.