पुण्यामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये मेट्रो सेवा महत्वाची भूमिका बजावते आहे. दररोज हजारो प्रवाशांना मेट्रोचा मोठा फायदा होतो आहे. मात्र तुम्ही सुद्धा मेट्रोने प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. यंदाच्या धुलिवंदनच्या निमित्ताने, पुणे मेट्रो प्रशासनाने महत्त्वाची घोषणा केली आहे. शुक्रवारी, 14 मार्च रोजी, मेट्रो सेवा काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मेट्रो प्रशासनाने प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे आणि त्यांना वेळापत्रक पाहून प्रवासाचे नियोजन करण्याची सूचना दिली आहे.
कधी बंद राहील मेट्रो
मेट्रो प्रशासनाच्या माहितीनुसार, मेट्रोची सेवा दोन्ही मार्गांवर सकाळी 6.00 ते दुपारी 3.00 या वेळेत बंद राहील. त्यानंतर, दुपारी 3.00 ते रात्री 11.00 या वेळेत मेट्रो सेवा सामान्यपणे सुरु होईल.
पुणे मेट्रोचे मार्ग
सध्या पुणे मेट्रोचे दोन मार्ग कार्यरत आहेत—पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी. या मार्गांवर मेट्रो सेवा सकाळी 6.00 ते रात्री 11.00 पर्यंत प्रवाशांसाठी उपलब्ध आहे.
सुरक्षेत वाढ
धुलिवंदन आणि होळी सणांच्या पार्श्वभूमीवर, पुणे मेट्रोच्या सर्व स्टेशन आणि प्लॅटफॉर्मवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याशिवाय, कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार झाल्यास तात्काळ कारवाई केली जाईल, असेही मेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रवाशांनी या बदलांच्या बाबतीत काळजी घ्यावी आणि मेट्रो सेवा वापरण्यापूर्वी वेळापत्रकाची पाहणी करावी.