Mhada Lottery 2025 :”स्वप्नातलं घर, आता तुमचं होणार?” म्हाडाकडून ‘या’ विभागासाठी तब्बल 4000 घरांची सोडत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mhada Lottery 2025 : मुंबई आणि उपनगरात स्वतःचं घर घेणं ही सामान्य माणसासाठी दिवसेंदिवस अवघड होत चाललेली गोष्ट आहे. वाढत्या घरांच्या किंमती, आर्थिक असमानता आणि जमीन मर्यादा यामुळे अनेक मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील कुटुंबांसाठी स्वतःचं हक्काचं घर केवळ स्वप्न बनून राहिलं आहे. अशा काळात महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडा अनेकांसाठी आधारस्तंभ ठरत आहे. स्वस्त दरात आणि पारदर्शक लॉटरी प्रक्रियेतून घरे उपलब्ध करून देणाऱ्या म्हाडाच्या योजनांमुळे हजारो नागरिकांनी आपल्या स्वप्नातील घराचं दार उघडलं आहे.

2025 मध्ये म्हाडाच्या कोकण मंडळाकडून तब्बल चार हजार घरांची भव्य लॉटरी (Mhada Lottery 2025) जुलै महिन्यात जाहीर होणार असल्याचं अधिकृत वृत्त आहे. या लॉटरीत ठाणे आणि कल्याण परिसरातील घरांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असून, यामध्ये म्हाडाच्या स्वतःच्या प्रकल्पातील तसेच विविध शासकीय-निमशासकीय योजनेतून प्राप्त झालेल्या घरांचा समावेश असेल. या लॉटरीमुळे विशेषतः आर्थिकदृष्ट्या मागास आणि मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांना स्वतःचं घर घेण्याची मोठी संधी मिळणार आहे.

प्राईम लोकेशनमध्ये घरे

ठाण्यातील चितळसर भागात म्हाडाच्या प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या 1173 घरांचा समावेश या लॉटरीत असून, ही घरे प्राईम लोकेशनमध्ये असल्याने नागरिकांमध्ये त्याविषयी प्रचंड उत्सुकता आहे. दळणवळणाच्या दृष्टीने उत्तम आणि जीवनाश्यक सुविधांनी परिपूर्ण असलेल्या या घरांची मागणी अगोदरपासूनच प्रचंड आहे. त्याचप्रमाणे कल्याण परिसरात म्हाडाला अडीच हजारांहून अधिक घरे मिळाली असून तीही यंदाच्या लॉटरीचा भाग असतील. त्यामुळे ठाणे आणि कल्याण मिळून हजारो इच्छुकांना त्यांच्या बजेटमध्ये घर घेण्याची ही संधी मिळणार आहे.

सध्या कोकण म्हाडाने गेल्या दीड वर्षात तीन वेगवेगळ्या लॉटऱ्या काढल्या असून, त्यामध्ये सुमारे दहा हजार नागरिकांना स्वस्त घरं मिळाली आहेत. चौथी म्हणजे ही लॉटरी आणखी मोठ्या प्रमाणावर असणार असून, मुंबई व उपनगरात राहणाऱ्या व मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ही संधी आयती चालून आली आहे. या लॉटरीसाठी पात्रतेचे निकष, अर्जाची प्रक्रिया आणि लॉटरीची अंमलबजावणी याविषयीची संपूर्ण माहिती म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवर जुलै महिन्यात प्रसिद्ध केली जाणार आहे.

याव्यतिरिक्त, 2025 मध्ये म्हाडाच्या मुंबई मंडळातही सुमारे पाच हजार घरांची लॉटरी दिवाळीपूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे. यामध्ये मुंबईकरांना विशेषतः पश्चिम उपनगरातील लोकेशन्समध्ये घर मिळण्याची संधी उपलब्ध होईल. राज्य सरकारच्या यंदाच्या अर्थसंकल्पात म्हाडाकडून 19,497 घरं उभारण्याचं उद्दिष्ट ठेवलं असून त्यामध्ये केवळ मुंबईतच 5199 घरं उभारण्यात येणार आहेत. पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि कोकण विभागामध्येही विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.

ही घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), अल्प उत्पन्न गट (LIG) आणि मध्यम उत्पन्न गटासाठी (MIG) आरक्षित असतील. त्यामुळे खरंच गरज असलेल्या कुटुंबांना पारदर्शक प्रक्रियेद्वारे आणि परवडणाऱ्या किमतीत घर मिळवण्याची संधी निर्माण झाली आहे. ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया, दस्तऐवज तपासणी आणि संगणकीय सोडत यामार्फत ही घरे वाटप केली जातील. त्यामुळे लॉटरी प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा अनियमितता होण्याची शक्यता कमी आहे.

म्हाडा लॉटरी 2025 ही एक योजना नसून, अनेक कुटुंबांचं भविष्य बदलण्याची क्षमता असलेली संधी आहे. घर म्हणजे केवळ चार भिंती नाहीत, ते असतं सुरक्षिततेचं, स्थैर्याचं आणि आत्मसन्मानाचं प्रतीक. अशा वेळेस, म्हाडा लॉटरीसारख्या योजना सामान्य माणसाच्या जीवनात आशेचा किरण बनतात.