MHADA Lottery| कोकण विभागातील म्हाडाच्या घरांसाठी वाट बघणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. म्हाडाच्या कोकण विभागात उपलब्ध असलेल्या 2264 घरांसाठी जाहीर करण्यात आलेली लॉटरी आता पुढे ढकलण्यात आली आहे. 31 जानेवारी 2025 रोजी होणारी लॉटरी फेब्रुवारी महिन्यात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. अद्याप या लॉटरीच्या नव्या तारखेची अधिकृत घोषणा झालेली नसली.
या गृहनिर्माण योजनेअंतर्गत म्हाडाने (MHADA Lottery) 2264 घरांसाठी अर्ज मागवले होते. त्यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी 594 सदनिका, 15% एकात्मिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 825 घरे आणि कोकण गृहनिर्माण मंडळाच्या 728 सदनिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत. अर्जप्रक्रिया 11 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झाली होती आणि सुरुवातीला 27 डिसेंबर 2024 रोजी लॉटरी काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, अर्ज करण्यासाठी अधिक वेळ देण्याच्या उद्देशाने अर्ज करण्याची अंतिम मुदत 26 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती.
दरम्यान, अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे ही लॉटरी 21 जानेवारी 2025 पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत घरांसाठी अत्यल्प उत्पन्न गटातील अर्जदारांसाठी वार्षिक 6 लाख रुपये उत्पन्न मर्यादा ठेवण्यात आली आहे. यासह, अल्प उत्पन्न गटासाठी 9 लाख रुपये, तर मध्यम उत्पन्न गटासाठी 12 लाख रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
सध्या या योजनेंतर्गत एकूण 16,000 घरे उपलब्ध आहेत. त्यापैकी 2,200 घरे लॉटरीद्वारे (MHADA Lottery) लाभार्थ्यांना वितरित केली जाणार आहेत, तर उर्वरित 14,000 घरे ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्वावर विक्री केली जाणार आहेत. कोकण विभागातील या लॉटरीमध्ये सर्वाधिक घरे ठाणे शहर व जिल्ह्यात उपलब्ध आहेत. त्यात कल्याण, टिटवाळा, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील ओरस, वेंगुर्ला आणि मालवण येथील सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत.




