सध्याच्या महागाईच्या काळात हक्काचं घर घ्यायचं म्हणजे काही साधी सुधी गोष्ट नाही. शहरांमध्ये तर घरांच्या किंमती आभाळाला टेकल्या आहेत. अशा स्थितीत आपल्या हक्काचे घर घेणाऱ्यांच्या स्वप्नांना बळ देणारी संस्था म्हणजे ‘म्हाडा’. म्हाडाच्या मुंबई मंडळाची जाहिरात निघाली आहे. मात्र लवकरच म्हाडाच्या कोकण मंडळाची लॉटरी निघण्याची शक्यता आहे. माध्यमांच्या रिपोर्ट नुसार कोकण मंडळाच्या वतीनं सुमारे 8 हजार घरांची लॉटरी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काढण्यात येणार आहे. त्यामुळं दसऱ्याच्या आधीच अनेकांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे.
वसईसह ठाणे आणि टिटवाळा परिसरात असतील घरं
म्हाडाकडून 3 ऑक्टोबरला ठाण्यातील 20 टक्के योजनेतील 213 घरांची प्रथम प्राधान्य योजनेची जाहिरात जारी केली जाण्याची शक्यता आहे. यानंतर 8 ऑक्टोबर रोजी म्हाडा योजनेतील 7 हजार घरांची लॉटरी काढली जाईल. म्हाडाच्या या सोडतीमध्ये खासगी बिल्डरमार्फत मिळालेल्या 993 घरांचा समावेश असेल. या घरांपैकी बहुतांश घरं वसईसह ठाणे आणि टिटवाळा परिसरात असतील. या घरांच्या किमती 20 लाखांपर्यंत असल्यामुळं ही सोडत अनेकांसाठीच मोठी मदत करताना दिसेल.
सध्या म्हाडाच्या वतीनं 2030 घरांच्या सोडतीची तयारी सुरू असतानचा तिथं कोकण मंडळांनंही सोडतीची तयारी केली असून, म्हाडाची घरं, रहिवाशांच्या तक्रारी या सर्व परिस्थितीचा आढावा घेत म्हाडानं हे सर्व प्रश्न विचाराधीन घेतले आहेत. म्हाडाच्या वतीनं ठाणे, वसई आणि टिटवाळा येथे सोडत जाहीर केली जाणार असल्यामुळं कमी उत्पन्न असणाऱ्या तरीही हक्काच्या घरासाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी मोठी मदत होणार आहे.