हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Microsoft Investment In AI – गेल्या काही वर्षांपासून एआय (Artificial Intelligences) ने सर्व क्षेत्रात प्रचंड धुमाकूळ घातला आहे. या क्षेत्रात भारताला जागतिक स्तरावर अग्रस्थानावर पोहचवण्यासाठी मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी मोठी घोषणा केली आहे. हि घोषणा त्यांनी मायक्रोसॉफ्ट एआय टूर कार्यक्रमात बोलताना केली असून , येत्या दोन वर्षांत भारतात एआय संदर्भातील कौशल्य विकास आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी तब्बल 3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले आहे. तर चला या बातमीची सविस्तर माहिती पाहुयात.
भारतात नवीन डेटा सेंटर्स उभारणार-
या गुंतवणुकीअंतर्गत मायक्रोसॉफ्ट (Microsoft Investment In AI) भारतात नवीन डेटा सेंटर्स उभारणार आहे. सध्या भारतात कंपनीची तीन डेटा सेंटर्स कार्यरत असून, 2026 पर्यंत 4 डेटा सेंटर सुरू होण्याची शक्यता आहे. या पायाभूत सुविधांमुळे भारतातील एआय क्षेत्राला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
एक कोटी भारतीयांना एआयसंदर्भात प्रशिक्षण (Microsoft Investment In AI) –
सत्या नडेला यांनी भारतातील तरुणांच्या कौशल्य विकासावर भर देत मायक्रोसॉफ्टच्या अॅडव्हांटेज इंडिया कार्यक्रमांतर्गत एक कोटी भारतीयांना एआयसंदर्भात प्रशिक्षण देण्याची योजना जाहीर केली. पुढील पाच वर्षांत हे प्रशिक्षण दिले जाणार असून, भारत सरकार, स्वयंसेवी संस्था आणि व्यावसायिक संघटनांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला जाणार आहे. मायक्रोसॉफ्टने गेल्या वर्षभरात 24 लाख भारतीयांना एआय प्रशिक्षण दिले आहे. यामध्ये 65% महिला प्रशिक्षणार्थी होत्या. विशेष म्हणजे, 74% प्रशिक्षणार्थी हे द्वितीय किंवा तृतीय श्रेणीतील शहरांमधील होते. हा उपक्रम पुढेही व्यापक प्रमाणात सुरू राहणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
देशभरातील नागरिक आणि संस्थांना फायदेशीर –
AI (Artificial Intelligences) च्या क्षेत्रात भारत वेगाने प्रगती करत आहे. या क्षेत्रात नव्या संधी निर्माण होत आहेत. मायक्रोसॉफ्टकडून करण्यात येत असलेली गुंतवणूक ही भारताला एआय क्षेत्रात आघाडीवर नेण्याच्या आमच्या बांधिलकीचा एक भाग आहे. याचा फायदा देशभरातील नागरिक आणि संस्थांना होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मायक्रोसॉफ्टच्या या गुंतवणुकीमुळे भारताच्या डिजिटल क्रांतीला गती मिळेल आणि एआय क्षेत्रात भारताचा प्रभाव वाढेल.