हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधान परिषदेच्या ११ सदस्यांची मुदत येत्या २७ जुलै २०२४ रोजी संपत असून या रिक्त होऊ घातलेल्या ११ जागांसाठी १२ जुलै २०२४ रोजी मतदान होत आहे. या ११ जागांसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण १२ उमेदवारांनी अर्ज दाखल झाले. विधानसभेत पुरेसे संख्याबळ नसताना महाविकास आघाडीने विधान परिषद निवडणुकीत मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्या रूपाने तिसरा उमेदवार रिंगणात उतरवल्याने नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. नार्वेकरांच्या या अचानक झालेल्या एन्ट्रीमुळे कोणाची गेम होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष्य असेल.
विधान परिषदेसाठी भाजपच्या पाच, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी दोन, तर काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि शेतकरी कामगार पक्षाच्या प्रत्येकी एक उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीने सुरुवातीला दोन जागा लढवण्याची तयारी केली होती. यापैकी एक जागा काँग्रेस लढवणार होती तर दुसऱ्या जागेसाठी शेकापच्या जयंत पाटलांना पवार गट आणि ठाकरे गट पाठिंबा देतील, असे ठरले होते. मात्र, शिवसेना ठाकरे गटाने ऐनवेळी मिलिंद नार्वेकर याना उमेदवारी दिल्यामुळे रंगत वाढली आहे. नार्वेकरांच्या उमेदवारीमुळे कोणाचे टेन्शन वाढणार? कोणाचा गेम होणार ते निकालानंतरच समजेल.
23 मतांचा कोटा-
विधान परिषदेसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी मतांचा कोटा २३ वर आला आहे. पक्षीय बलाबल बघायचं झाल्यास सध्या विधानसभेत काँग्रेसचे ३७, ठाकरे गटाचे १५ आणि शरद पवार गटाचे १३ असे एकूण ६५ आमदार आहेत. क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाख उद्धव ठाकरेंसोबत असल्याने महाविकास आघाडीचे संख्याबळ ६६ पर्यंत जाते. त्यामुळे महाविकास आघाडीला आपले तिन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी ६९ मतांची गरज आहे. त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना आपला तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी मते फोडावी लागतील.
कोण कोण विधान परिषदेच्या रिंगणात ?
भाजप : पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, सदाभाऊ खोत,अमित गोरखे,
शिंदे गट : भावना गवळी, कृपाल तुमाने
अजित पवार गट : राजेश विटेकर, शिवाजी गर्जे
काँग्रेस : डॉ. प्रज्ञा सातव उद्धव सेना :
ठाकरे गट– मिलिंद नार्वेकर
शेकाप : जयंत पाटील