ITI विद्यार्थ्यांना मिळणार 40 रुपयांऐवजी 500 रुपये विद्यावेतन; सरकारची मोठी घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील हजारो औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (ITI) विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाबाबत राज्य सरकारकडून आज मोठी घोषणा करण्यात आली. शासकीय आयटीआय संस्थांमधील विद्यार्थ्यांना मागील अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना 40 रुपये विद्यावेतन देण्यात येत होते. आता, त्यात वाढ करण्यात येणार असून 500 रुपयांचे विद्यावेतन देण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान परिषदेत दिली.

आज नागपूर येथील विधिमंडळाच्या अधिवेशनात विधानसभेच्या कामकाजावेळी आमदार विक्रम काळे, डॉ. सुधीर तांबे, सतिश चव्हाण, बाळाराम पाटील यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ करण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला. राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना दरमहा 40 रुपये विद्यावेतन दिले जात आहे. वाढत्या महागाईच्या काळात हे विद्यावेतन अतिशय कमी आहे, असा मुद्या आमदारांनी उपस्थित केला. त्यावर कौशल्य, रोजगारमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उत्तर दिले.

मंत्री लोढा म्हणाले की, राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षणार्थ्यांसाठी असलेले विद्यावेतन हे 40 रुपयांवरून 500 रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. संबंधित प्रस्ताव हा मंत्रीमंडळासमोर मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. दरम्यान, लवकरच विद्या वेतनात वाढ केली जाईल, असे मंत्री लोढा यांनी म्हंटले.