सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात शपथ घेतलेले पाटणचे शिवसेना आमदार शंभूराज देसाई प्रथमच कराड शहरात आले होते. यावेळी शंभुराजें देसाई यांनी कराडच्या प्रितीसंगमावरील स्वर्गिय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन करत पृथ्वीराज चव्हाणांची त्यांनी भेट घेतली.
आज सकाळी शंभूराज देसाई कराड शहरात दाखल झाले होते. यावेळी कराड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. शहरात दाखल होताच देसाई यांनी प्रथम शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास अभिवादन केलं. त्यानंतर प्रितीसंगमावरील स्वर्गिय यशवंतराव चव्हाण यांचे समाधीला अभिवादन करुन त्यांनी पी डी पाटील यांचे प्रतिमेचे दर्शन घेतले.
त्यानंतर देसाई यांनी थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवसास्थानी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. चव्हाण कुटूबियांनी त्यांचे औक्षण करत, शाल श्रीफळ देत त्यांचा सत्कार केला. कराड दौऱ्यात शहरातील नागरिक, शिवसैनिक यांच्याकडून ठिकठिकाणी नामदार शंभुराजे देसाई यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला.