मिरज विधानसभा मतदारसंघ भाजपच्या सुरेश खाडे यांच्या हातातून जाणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सलग तीन टर्मची हॅट्रिक… अनेक मातब्बरांना पाणी पाजत मिरजेची आमदारकी गेली पंधरा वर्षे एक हाती ठेवणारा… भाजपचा हा चेहरा म्हणजे सुरेश खाडे (Suresh Khade) … आमदारकी, पालकमंत्री आणि मंत्रीपद असा राजकीय चढता भाजणीचा इतिहास असणाऱ्या खाडेंनी मिरजेत कुठल्याच प्रतिस्पर्ध्याला टिकू दिला नाही… मिरजेत फक्त आपणच! अशा वर्चस्वाच्या राजकारणातून त्यांनी मतदारसंघात पकड मिळवली… पण डाव पलटलाय… लोकसभेला मिरजेतून महायुतीच्या बाजूने मायनस मध्ये लीड गेलंय… आकडा सांगतोय, विद्यमान आमदार खाडे साहेब यांची आमदारकी धोक्यात आहे… म्हणूनच खाडेंना पराभवाचा धडा शिकवण्यासाठी अनेक मातब्बर मिरजसाठी तयारी करतायत.. अगदी त्यात लोकसभेला डिपॉझिट जप्त झालेल्या ठाकरे गटाच्या चंद्राहार पाटलांचेही नाव आहेच… खाडे यांच्या आमदारकीचा चौकार रोखण्यासाठी डझनभर इच्छुक उमेदवार नेमके आहेत तरी कोण? यापैकी भाजपचा पराभव करत मिरजचा खाडेंचा बालेकिल्ला ढासळवण्याची हिंमत नेमकी कुणाच्यात आहे? मविआ ते महायुती यांच्यात मिरजसाठी चाललेली रस्सीखेच ते मिरजच्या स्थानिक जनतेचा कौल नेमका कुणाच्या बाजूने आहे? त्याचाच हा सविस्तर आढावा…

सांगलीचे पालकमंत्री आणि मिरज विधानसभेचे स्टॅंडिंग आमदार सुरेश खाडे यांच्या विरोधात लढत देण्यासाठी तब्बल दोन डझनभर इच्छुकांनी राजकारण तापवायला सुरुवात केलीये… लोकसभेला मिरजेतून भाजपचं लीड घटल्याने यातल्या अनेकांना आता आमदारकीची स्वप्नही पडू लागलेत… खरतर 2009 मध्ये नव्याने तयार झालेला मिरज हा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव झाला… तेव्हापासून ते सलग तीन टर्म भाजपाच्या तिकिटावर वन साईड निवडणूक जिंकण्याचा करिष्मा हा सुरेश खाडे यांनी केला… खरंतर खाडे यांचा पराभव करणं तशी फा र अवघड गोष्ट नाही… पण विरोधकांच्यात एकी कमी आणि बेकी जास्त… 2009 ला राष्ट्रवादी काँग्रेस तर 2014 ला काँग्रेसकडून तर 2019 ला बाळासाहेब होनमारे यांनी स्वाभिमानी कडून खाडेंना लढत दिली खरी पण खाडे मोठ्या लीडने दणक्यात विजयी झाले… खाडे कामगार मंत्री झाले…

मिरजेत भाजपच्या Suresh Khade यांच्या हातातून जाणार? । Miraj Vidhan Sabha

जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आल्याने सांगलीतील त्यांचं वजनही वाढलं… पण याच पालकमंत्र्यांना आपल्याच हक्काच्या बालेकिल्ल्यातून विधानसभेला मायनस मध्ये जावं लागलय… त्यामुळे खाडेंच्या राजकीय वर्चस्वला सव्वाशेर होण्यासाठी अनेक इच्छुकांनी सध्या दंड थोपटलेत… अर्थात त्यात पहिलं नाव येतं ते प्राध्यापक मोहन वनखंडे यांचं… खरंतर खाडेंच्या राजकारणाच्या पाठीशी सावलीसारखे उभे राहणारे वनखंडे हे त्यांचे स्वीय सहाय्यक… खाडेंच्या राजकीय मोर्चेबांधणीपासून ते प्रशासकीय कामांची पूर्तता करण्यापर्यंत पडद्या आडून सगळी सूत्र वनखंडेच चालवत होते… पण सुरेश खाडेंना पालकमंत्री पद भेटल्यानंतर या राम- लक्ष्मण जोड गोळी एक मिठाचा खडा पडला… दोघे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले… तब्बल दीड दशकांच्या राजकीय जनसंपर्काच्या जोरावर सध्या ते खाडेंऐवजी आपल्याला तिकीट मिळावं, यासाठी लॉबिंग करत आहेत…

दुसर्‍या बाजूला महायुतीतूनच जनसुराज्य शक्तीने मतदारसंघावर प्रबळ दावा केला आहे. राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर जनसुराज्यने आपल्या वाट्याला मिळणारा विकास कामाचा निधी मिरज मतदारसंघासाठी खेचून आणला. पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी मिरजेतील मेळाव्यात मिरजेवर केलेला दावा आणि यानंतर प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी मिरजची जागा जनसुराज्यच लढवेल, अशी ठाम भूमिका घेतल्याने पालकमंत्र्यांनाच उमेदवारीसाठी धडपड करण्याची वेळ मिरजमध्ये आली आहे… त्यात शिंदे गटाकडूनही युवा आघाडीचे जिल्हा प्रमुख सचिन कांबळे यांनी गावभेट दौरे सुरू करून उमेदवारीचा एल्गार केला आहे… थोडक्यात महायुतीमध्ये मिरजची जागा कोण लढवणार? यावरून बराच झांगडगुत्ता असल्याचं पाहायला मिळतंय…

दुसऱ्या बाजूला मविआमध्येही उमेदवारीचा जोर काही कमी नाही… काँग्रेसमधून ठाकरेंचं शिवबंधन हाती बांधलेल्या प्रा. सिद्धार्थ जाधव यांनी काहीही झालं तरी निवडणूक लढणारच, असा जणू पण केलाय… बाळासाहेब होनमारे यांनीही आत्तापर्यंत जमलं नाही पण 2024 ला एक घाव आणि दोन तुकडे करायचेच, असा चंग बांधल्याने खाडेंसाठी आमदारकी वाटते तितकी सोपी नक्कीच नाही… महेशकुमार कांबळे, महेंद्र गाडे, महादेव दबडे, इंद्रजित घाटे, सी. आर. सांगलीकर, अशोक कांबळे अशा एक ना दोन डझन इच्छुकांची भाऊगर्दी एकट्या मिरजसाठी झाल्याने मिरजच्या आमदारकीचा तिढा आणखीन गुंतागुंतीचा झाला आहे… त्यात सुरेश खाडे यांनी आयत्या टायमिंगला आपला मुलगा सुशांत खाडे याचं पॉलिटिकल लॉन्चिंग करण्यासाठी खेळी केलीच तर मिरजचं राजकारण गरमा गरमीचं होऊ शकतं…

त्यात निवडून आल्यानंतर खाडे गायब होतात आणि पुढच्या निवडणुकीआधी वर्षभर हात सैल सोडतात, असं तोंडसुख त्यांच्यावर नेहमीच घेतलं जातं… मनी आणि मसल पॉवर असल्यामुळे पक्षापेक्षा आपलं बस्तान बसवण्यात त्यांचा जास्त इंटरेस्ट असतो, असा आरोपही त्यांच्यावर वारंवार होत असतो… म्हणूनच जिल्हाध्यक्षांपासून खासदारा पर्यंतची सगळी मंडळी त्यांना थोडीफार टरकून असल्याचंही बोललं जातं… आपल्या मतदारसंघातील खड्डे नीट करता आले नाहीत… अनेक योजना, प्रकल्प हे गोगलाईच्या संथ गतेने पुढे सरकतायत… अर्थात पायाभूत सुविधा आणि औद्योगिक जाळं या सगळ्या पातळ्यांवर खाडे साहेबांची उदासीनता पाहता मिरजची जनता त्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचे चान्सेस सध्या जास्त वाढलेत… पण वाढलेल्या इच्छुकांची भाऊ गर्दी पाहता… गटतट आणि बंडखोरी झाली… तर विस्कटलेलं मतदान खाडे साहेबांच्या पथ्यावर पडू शकतं, हेही तितकच खरं…