राजेंद्र शिंगणे आणि गायत्री शिंगणे यांच्यात आमदारकीची लढत; खऱ्या राष्ट्रवादीचा कस लागणार

Sindhkhed raja vidhan sabha
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचं एका वाक्यात विश्लेषण करायचं झालं तर झांगडगुत्ता या एका शब्दाने होऊ शकतो… सिंदखेडराजाचे विद्यमान आमदार साहेब आहेत राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंगणे… सध्याचे अजित पवार गटासोबत असले तरी तुतारी की घड्याळ याबद्दल त्यांचं तळ्यात मळ्यात सुरू झालंय… राजेंद्र शिंगणे हे नाव जरी स्ट्रॉंग असलं तरी महायुतीत इच्छुकांची डझनभर लाईन असल्याने आपला प्रचार एकदिलाने होईल का? याची धाकधूक तर त्यांना आहेच… पण दुसऱ्या बाजूला शरद पवारांनी राजेंद्र शिंगणे यांचीच पुतणी गायत्री शिंगणे हिला बळ द्यायला सुरुवात केल्याने आमदार साहेबांच्या पायाखालची वाळू सरकलीय… या सगळ्यात रविकांत तुपकर फॅक्टर कुणाच्या मुळावर उठणार याचही जाम टेन्शन शिंगणे साहेबांना आलेलं असणार… म्हणूनच या सगळ्या झांगडगुत्त्यामध्ये सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचा आमदार यंदा कोण होतोय? वर्तमान स्थितीबद्दल बोलायचं झालं तर सिंदखेडची जनता कोणत्या चेहऱ्याच्या पाठीशी आमदारकीला ठामपणे उभी राहील? त्याचंच हे जमिनीवरचे विश्लेषण…

राजेंद्र शिंगणे यांचे वडील भास्करराव शिंगणे यांनी बुलडाण्यात सहकाराची मुहूर्तमेढ रोवली… सहाकाराचं जाळं जिल्हाभर विणलं. राजेंद्र शिंगणे यांनीही हे जाळं विस्तारत नेत आपला लोकसंपर्क अधिक वाढवला… याच सहकाराच्या बळावर राजेंद्र शिंगणे यांचं राजकारण मतदार संघात रुजलं… मोठं झालं… विदर्भ को-ऑपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशन ते जिल्हा सहकारी बँकांवर पकड असल्यामुळे त्यांना सहकारातील जाणते नेते म्हणून आगळीवेगळी ओळख मिळाली…राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेडराजा या मतदारसंघाचे शिंगणे प्रतिनिधित्व करतात… पण आपल्या राजकारणाला विधिमंडळापर्यंत घेऊन जाण्याची संधी त्यांना चालून आली ती 1995 साली… 1995 मध्ये पहिल्यांदा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले आणि यानंतर सबकुछ शिंगणे असं सिंदखेडराजाचं समीकरण बनून गेलं… 2014 चा एक अपवाद वगळता ते सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे अनबिटेबल आमदार राहिले आहेत…

2009 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र, दोन्ही वेळा ते विधानसभा निवडणुकीत विजयी झाले… राज्यमंत्री आणि कॅबिनेटमंत्री म्हणून दहा वर्षांचा अनुभव पाठीशी असताना आरोग्य खाते, महसूल खात्याचे राज्यमंत्रीपदही सांभाळलेले आहे. तसेच क्रीडा आणि माहिती जनसंपर्क खात्याचे राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं… परंतु, निवडून येण्याची हमखास गॅरंटी असतानाही पाच वर्षे निवडणुकीपासून अलिप्त राहणारे शिंगणे हे एकमेव नेते असतील. त्यांनी 2014ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढली नाही. निवडणुकीपासून अलिप्त राहिले. मात्र, जिल्ह्यातील राजकारणावर पकड कायम ठेवली. जिल्हा परिषदा, पंचायत समितीवर आपले प्रतिनिधी निवडून आणत त्यांनी आपलं वर्चस्व कायम राखलं. त्या पाच वर्षात ते एकाही सरकारी बैठकांना गेले नाहीत. कोणत्याही पदावर नसल्याने जाण्याचा प्रश्नही नव्हता. मात्र, मतदारसंघातील संपर्क मात्र त्यांनी कमी होऊ दिला नाही….

थोडक्यात शिंगणे किमान सिंदखेडराजा मतदार संघासाठी तरी वन मॅन आर्मी ठरले… 2019 ला भाजपा शिवसेनेने ताकद लावूनही… आणि मोदी लाट असतानाही… शिंगणे सिंदखेडराजातून आरामात निवडून आले… पण शिंगणे यांचं नाव सर्वात जास्त हायलाईट झालं ते पहाटेच्या शपथविधीवेळेस…. राजभवनातील या शपथविधीला शिंगणेही उपस्थित होते. या शपथविधीनंतर शिंगणेंनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी संपर्क साधून त्यांना याची माहिती दिली होती… हेच शिंगणे राष्ट्रवादीच्या फुटीनंतरही तळ्यात मळ्यात करत जिल्हा बँकेचं कारण देत अजितदादांसोबत महायुतीचा भाग झाले… सध्या शिंगणे हेच स्ट्राँग उमेदवार असले तरी महायुतीकडून डझनभर इच्छुक असल्याने शिंगणे सध्या चांगलेच कचाट्यात सापडलेत….

ज्या डॉ. शिंगणेंना विरोध करण्यासाठी व राजकीय भविष्यासाठी खेडेकर शिंदेच्या शिवसेनेत गेले तेच डॉ.शिंगणे अजित पवारांच्या माध्यमातून पुन्हा महायुतीसोबत जोडले गेले.. सासुमुळे वाटणी झाली अन् सासुच वाट्याला आली अशी अवस्था माजी आमदार डॉ. खेडेकरांची झाली… शशिकांत खेडेकर, डॉ.सुनील कायंदे, तोताराम कायंदे, डॉ.गणेश मांटे, योगेश जाधव, विनोद वाघ अशी भली मोठी लाईन महायुतीकडून सिंदखेड राजाचं मैदान मारण्यासाठी इच्छुक असल्याने सेफ झोन म्हणून डॉ. शिंगणे निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटात जातील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरतेय… नुकतंच अजित पवारांसोबत आपण नाईलाजाने गेलो… मागच्या दोन-अडीच वर्षांपासून शरद पवारांशी संबंध तोडले असं काही नाही. आजही मी त्यांना नेता मानतो…. असं विधानसभेच्या तोंडावरच शिंगणे यांनी हे स्टेटमेंट करून तुतारी हाती घेण्याचे अप्रत्यक्ष संकेत तर दिलेच… पण त्यासोबत उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्यांनाही चांगलंच कन्फ्युज करून सोडलंय…

त्यात सध्या तरी शरद पवार गटाकडूनच शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे यांचंही नाव उमेदवारीसाठी फ्रंटला आलंय.. उमेदवारीसाठी शरद पवारांची भेट घेऊन संधी मिळाली तर सोन करेल, असं बोलून त्यांनी अप्रत्यक्ष काकांच्या विरोधातही दोन हात करण्याची तयारी दाखवलीय… तरुण पिढीला संधी देण्याच्या शरद पवारांच्या फिल्टर मध्ये गायत्री शिंगणे बसल्या… आणि डॉ. शिंगणे अजित पवार गटासोबटच राहिले तर काका विरुद्ध पुतणी, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी, घड्याळ विरुद्ध तुतारी अशी सर्वात जास्त घासून लढत सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळू शकते…पिक विमा, पिक कर्ज, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आदी मागण्यांसह शरद पवार गटाच्या गायत्री शिंगणे यांनी तहसील कार्यालयावर काढलेला मोर्चा जबरी हिट झाला… बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस कार्याध्यक्ष पदावर असणाऱ्या गायत्री काकांचा विरोधात उभ्या राहिल्या तर शरद पवारांची ताकद, राष्ट्रवादीचा बेस, मराठा, दलित, मुस्लिम समाजाचा पाठिंबा हे सगळं प्लस मध्ये राहिलं तर शिंगणेंवर स्वतःच्याच घरातून पराभव स्वीकारण्याची वेळ येणाऱ्या विधानसभेला येऊ शकते…

हे कमी होतं की काय म्हणून रविकांत तुपकर सिंदखेडराजासाठी कशी फिल्डिंग लावतील यावरही इथली बरीचशी समीकरणे अवलंबून आहेत… लोकसभा निवडणुकीत रविकांत तुपकर यांना या मतदारसंघातून २९ हजारांचा लीड मिळालंय… यासोबतच निवृत्ती घेतलेले प्रशासकीय अधिकारी दिनेश गीते हे देखील या मतदारसंघातून इच्छुक असल्याच्या चर्चा आहेत… मात्र कोणत्या पक्षात प्रवेश करावा याबाबत सगळेच इच्छुक कन्फ्युज आहेत… कारण जोपर्यंत डॉ.शिंगणे यांची भूमिका स्पष्ट होत नाही तोपर्यंत इतर इच्छुकांची धाकधूक तर होणारच…

डॉ.शिंगणे पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेले तर तिथेही सगळ्यात आधी त्यांच्याच नावाचा विचार होईल…पण अजित पवार गटात असल्याने स्टँडिंग आमदार म्हणून त्यांच्याच नावावर उमेदवाराचा शिक्का पडणार, हे तर कन्फर्म आहे… त्यामुळे भविष्यातील निवडणूक निकालाचे सोडा पण उमेदवारी मिळवण्याच्या विषयात तरी डॉ.शिंगणे यांची पाचही बोटे तुपात असल्याची परिस्थिती आहे… अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी मिळवण्याच्या शर्यतीत असणाऱ्यांना कन्फ्युज करण्याचा प्लॅन डॉ.शिंगणे यांचा दिसतोय…त्यामुळेच पुन्हा एकदा आमदार होण्याची प्रचंड महत्त्वकांक्षा बाळगून असलेल्या डॉ. शशिकांत खेडेकरांच्या नशिबात काय वाढून ठेवलंय? याच्या उत्तरासह इच्छुक उमेदवारांचा जांगडगुत्ता कसा सुटतो? डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या मनात नेमक काय चाललय? हे येणाऱ्या काळात जितक्या लवकर स्पष्ट होईल, तितक्या लवकर सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाबाबत क्लॅरिटी सर्वांनाच येईल…पण सध्या तरी, डॉ. शिंगणेच, इथे प्लस मध्ये दिसतायेत… पणते घड्याळ की तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार? त्यावर, पुढची राजकीय समीकरणे अवलंबून असणार आहेत, एवढं मात्र नक्की… बाकी सिंदखेडराजा मधून 2024 ला आमदार म्हणून कोण निवडून येतंय? तुमचं पॉलिटिकल प्रेडिक्शन काय सांगत? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा…