तुळजापूर विधानसभा मतदारसंघात आमदार राणा जगजीतसिंग रेड झोनमध्ये आहेत

tuljapur rana jagjitsinh
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आई तुळजाभवानीचा स्पर्श जिथल्या कणाकणात आहे तो तुळजापूर विधानसभा मतदारसंघ… धार्मिक केंद्र, शक्तीपीठ म्हणून देशभर ख्याती असणाऱ्या या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत भाजपचे दिग्गज नेते राणा जगजीतसिंह पाटील… पण याच नेत्याला येणाऱ्या विधानसभेत पराभव डोळ्यांसमोर दिसू लागलाय… आधी खासदारकीला पत्नी आणि आता विधानसभेला स्वतः तुळजापूरची उमेदवारी धोक्यात येण्यामागचं कारण ठरलीय ती फक्त एक व्यक्ती… ती म्हणजे खासदार ओमराजे निंबाळकर… राणा जगजीतसिंग यांच्या राजकारणावर तुळशीपत्र ठेवण्यासाठी… त्यांचं राजकारण मुळापासून उपटून काढण्यासाठी राणांच्या विरोधातील उमेदवारासाठी आता खासदार साहेबांनी फिल्डिंग लावलीय… त्यामुळे पाटील विरुद्ध निंबाळकर असा पाहायला मिळणारा राजकीय विस्तव तुळजापूर मध्येही पाहायला मिळणार का? राणा जगजीतसिंग हे पुन्हा आमदार होतायत का? तुळजापूरच्या विधानसभेसाठी पडद्याआड नेमकं काय राजकारण चाललंय? त्याचीच ही इनसाईड स्टोरी…

तुळजाभवानीच्या मंदीरात पूजा करताना धोतर परिधान करावं लागतं म्हणूनच की काय तुळजापूरला धोतरवाला आमदार होतो, अशी जणू अलिखीत परंपरा होती.. शिवाजीराव पाटील बाभूळगावकर, शिक्षणमहर्षी आलुरे गुरुजी आणि यानंतर चार टर्म काँग्रेसच्या मधुकरराव चव्हाण या धोतरवाल्या राजकारण्यांनी तुळजापूरची आमदारकी आपल्या ताब्यात ठेवली… अगदी उतारवयातही धोतर घालून विधीमंडळ गाजवणारा राजकारणी म्हणून मधुकररावांची ओळख होती… लोकल बोर्ड, जिल्हा बँक, मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्षपद ते विधानसभेचे उपाध्यक्षपदही त्यांनी याच आमदारकीच्या जीवावर कमावलं… आघाडी सरकारच्या काळात ते काही काळ मंत्री देखील राहिले… पण एवढा सारा राजकीय वारसा लाभूनही मतदारसंघाचा म्हणावा असा विकास झाला नाही… त्यात तरुण आमदार देण्याची भाषा प्रत्येक निवडणुकीत करण्यात आली… पण त्याला विरोधकांना यश काही आलं नाही… पण 2018 पासूनच अशोक जगदाळे यांनी फिल्डींग लावत मधुकरराव चव्हाणांच्या विरोधात रान तापवलं…

मतदारसंघातील महिलासाठी देवदर्शन सहल, फिरता दवाखाना, टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा, जनावरासाठी चारा वाटप करत यंदा काहीही झालं तरी तुळजापूरची आमदारकी मिळवायचीच… असं जणू स्वतःशी चंग त्यांनी बांधला होता.. पण या सगळ्यात नवा ट्विस्ट आला तो म्हणजे निवडणुकीच्या काही दिवसांआधीच लोकसभेत पराभवाचा दणका बसलेल्या राणा जगजीतसिंग यांनी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश करत भाजपकडून तुळजापूरची उमेदवारी मिळवली… प्रचाराला अवघे काही दिवसच मिळूनही जगदाळेंनी मधुकररावांच्या विरोधात तयार केलेल्या वातावरणाचा फायदा राणा जगजीतसिंग यांना मिळाला… आणि प्रस्थापित मधुकरराव चव्हाणांचा पराभव करत तुळजापुरातून आमदारकी मिळवली…थोडक्यात 2019 ला धोतर नेसणारा आमदार म्हणून तुळजापूरची जी परंपरा होती ती मोडीत काढण्यात राणा जगजीतसिंग यांना यश आलं… राणा जगजीतसिंग यांनी जिल्ह्यातील आपलं राजकारण पुन्हा जिवंत ठेवलं…

पण आपल्या पत्नीला स्वतःच्याच हक्काच्या मतदार संघातून तब्बल 52 हजार मतांची पिछाडी असल्यामुळे आता लोकसभेला अर्चना पाटील यांच्या पराभवानंतर आता विधानसभेला राणा जगजीतसिंग पाटलांची तुळजापूरची आमदारकीही धोक्यात आलीय… म्हणूनच की काय एकेकाळी जिल्ह्यावर वचक ठेवणाऱ्या याच राणा जगजीतसिंह यांच्या विरोधात मैदानात उतरण्यासाठी अनेक इच्छुकांची भाऊगर्दी झालीये… महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी या जागेसाठी दावा ठोकलाय… राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेऊन तुळजापूर आपल्याकडे घ्यावा, अशी विनंती केली… तर मधुकरराव चव्हाण यांचा हा पारंपारिक बालेकिल्ला असल्यानं इथून काँग्रेसचाच उमेदवार असावा, असा रेटा काँग्रेस नेत्यांनी लावलाय… तिसरीकडे तुळजापूर मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकावा, हे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक शिवसैनिक आमदारकीची तयारी करतायत… त्यात स्पेसिफिकली बोलायचं झालं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अशोक जगदाळे तर देवानंद रोजकरी देखील यंदा राणा जगजीत सिंह पाटलांना अस्मान दाखवत जायंट किलर ठरू शकतात… अर्थात महाविकास आघाडीचा खासदार या नात्याने आणि जुनं राजकीय वैर असल्यानं ओमराजे आपली सारी यंत्रणा या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी लावतील, हे वेगळ्या शब्दात सांगायला नको…

बाकी विद्यमान आमदार म्हणजेच राणा जगजीतसिंह यांच्या मतदारसंघातील प्लस-मायनस बद्दल बोलायचं झालं तर शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक जास्त पीकविमा मतदारसंघात आणणारा आमदार म्हणून सध्या त्यांचं कौतुक केलं जातंय… औद्योगिक विकासासाठी त्यांनी केलेलं कामही कौतुकास्पद आहेच… पण जलसिंचनाचा अभाव, मंजूर न झालेला देवस्थानचा विकास आराखडा आणि रोजगार ते शिक्षणासारख्या सोयी सुविधा मतदारसंघात याव्यात, याबाबत असणारी निष्क्रियता या गोष्टी आमदार साहेबांना मायनस मध्ये घेऊन जाणाऱ्या आहेत… एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून पहिल्यांदाच म्हणजे 2019 ला राणा जगजीतसिंह पाटलांनी राष्ट्रवादीतून भाजपात येत निवडणूक लढवल्यामुळे तुळजापुरात पहिल्यांदाच कमळ फुललं होतं… पण एक टर्म पूर्ण होण्याच्या आतच पुन्हा इथं कमळाच्या पाकळ्या सुकून जात तुतारी, हाताचा पंजा किंवा मशालीचा उजेड तुळजापुरात पडेल, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करू लागलेत… जर राणा जगजीतसिंह यांचा तुळजापुरातून पराभव झालाच तर पाटील कुटुंबाच्या राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं… आता ते या सगळ्यातून सहीसलामत बाहेर पडून पुन्हा आमदार कसे होतायत? हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे…

महाविकास आघाडीचा जागेचा तिढा सुटू शकला नाही तर बंडखोरांमुळे राणा जगजीत सिंह यांच्या आमदारकीच्या वाटा सुकर होतील, हे वेगळ्या शब्दात सांगायला नको… बाकी तुम्हाला काय वाटतं? तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचा यंदाचा आमदार कोण? राणा जगजीत सिंह पाटील, अशोक जगदाळे की देवानंद रोजकारी? तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा…